मुंबई : प्रदूषण कमी करण्यासाठी मुंबईत कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला असून त्यासाठी कंपन्यांकडून स्वारस्य पत्रे मागविण्यात आली होती, त्याला पाच कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे. पाचही कंपन्या देशातील असून त्यात नवी मुंबईतील एका कंपनीचा समावेश आहे. उर्वरित चारही कंपन्या कर्नाटकमधील आहेत.
मुंबईतील प्रदूषण कमी करण्यासाठी कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. त्यानुसार पालिकेने या कामासाठी तयारी सुरू केली आहे. या क्षेत्रात काम करीत असलेल्या संस्थांकडून पालिकेने स्वारस्य अर्ज (एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट) मागवले होते. पालिकेला पाच कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे. त्यात एक कंपनी खारघर येथील असून उर्वरित तीन कंपन्या बेंगळुरूमधील, तर एक कंपनी कर्नाटकातील गदग येथील आहे.
हेही वाचा >>>मुंबई : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपली चिकित्सा योजना बंद पडण्याच्या मार्गावर
मुंबईतील प्रदूषण कमी करण्यासाठी पालिका प्रशासनाने विविध उपायांची चाचपणी सुरू केली आहे. त्यातच ऑक्टोबर महिन्यात पाऊस पडल्यानंतर काही दिवस हवेचा स्तर सुधारला होता. त्यामुळे प्रदूषण नियंत्रित ठेवण्यासाठी पालिकेने कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याचे ठरवले आहे. त्याकरिता पालिकेने स्वारस्य अर्ज मागवले होते. त्यानुसार पाच कंपन्या पुढे आल्या आहेत.कृत्रिम पाऊस पाडणाऱ्या नक्की किती कंपन्या देशात आहेत, त्याचा खर्च किती, किती दिवस त्याचा प्रभाव वातावरणावर राहतो याचा अंदाज यावा याकरीता अर्ज मागवण्यात आले होते. त्याकरिता इच्छुक संस्थाची माहिती मागवण्यात आली आहे. कंपनीची वार्षिक उलाढाल किती, कंपनीने गेल्या काही वर्षात कुठे कृत्रिम पावसाचे प्रयोग केले, त्यापैकी किती यशस्वी झाले त्याची माहिती मागवण्यात आली आहे. त्यानंतर निविदा काढून संबंधित कपनीबरोबर तीन वर्षांसाठी करार करण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.