मुंबई : मुंबईत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचल्याने पाच जणांना लेप्टोस्पायरोसिसची बाधा झाली आहे. पुढील दोन दिवस शहरात पावसाचा जोर असाच राहणार असल्यामुळे लेप्टोचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.
शहरात जूनमध्ये पावसाने हजेरी लावली असली तरी जुलैमध्ये दमदार पावसाला सुरुवात झाली आहे. गेो दहा दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचत आहे. यामुळे लेप्टोचा प्रसार व्हायला सुरुवात झाली आहे. जुलैच्या दहा दिवसांतच पाच जणांना लेप्टोची लागण झाल्याचे आढळले आहे. जूनच्या संपूर्ण महिन्यामध्ये १२ जणांना लेप्टोची लागण झाली होती. मुंबईत पावसाचा जोर कायम असल्यामुळे लेप्टोच्या रुग्णसंख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. जानेवारी ते १० जुलै या काळात शहरात ४० लेप्टोचे रुग्ण आढळले आहेत.
शहरात डेंग्यूचा प्रसार होत अजून गेल्या दहा दिवसांमध्ये १९ रुग्ण आढळले आहेत. स्वाईन फ्लूनेदेखील डोके वर काढले असून तीन जणांना फ्लूची लागण झाली आहे. हिवतापाचा प्रादुर्भावही कायम असून मागील दहा दिवसांत ११९ जणांना हिवतापाची बाधा झाली आहे.
मुंबई महानगरपालिकेने ७ ते ९ जुलै या काळात लेप्टोचे रुग्ण आढळलेल्या परिसरातील तीन लाख ४४ हजार २९१ घरांचे सर्वेक्षण केले आहे. साचलेल्या पाण्याशी संपर्क आलेल्या ४३ हजार २९७ प्रौढांना आणि ११४ बालकांना सर्वेक्षणादरम्यान प्रतिबंधात्मक औषधे देण्यात आली. पावसाच्या साचलेल्या पाण्यामधून जाणे टाळावे. साचलेल्या पाण्यात खूप वेळ राहिल्यास जवळच्या मुंबई महानगरपालिकेच्या दवाखान्यातून प्रतिबंधात्मक औषधे घ्यावीत. तसेच लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
साचलेल्या पाण्यात ‘लेप्टोस्पायरोसिस या रोगाचे ‘लेप्टोस्पायरा’ (स्पायराकिट्स) या सूक्ष्मजंतूचा प्रादुर्भाव असू शकतो. उंदीर, कुत्रे, घोडे, म्हशी इत्यादी प्राण्यांच्या मूत्रातून लेप्टोचे सूक्ष्मजंतू पावसाच्या पाण्यात मिसळतात. अशा बाधित झालेल्या पाण्याशी माणसाचा संपर्क आल्यास त्याला लेप्टोची बाधा होण्याची शक्यता असते. व्यक्तीच्या पायाला किंवा शरीराच्या कोणत्याही भागाला जखम असेल अथवा साधे खरचटलेले असेल, तरी अशा जखमेतूनही लेप्टोचे जंतू माणसाच्या शरीरात प्रवेश करतात.
लक्षणे अचानक भरपूर ताप येणे, डोकेदुखी, अंगदुखी, पोटदुखी, थंडी वाजणे, उलट्या होणे, स्नायू दुखणे इत्यादी लक्षणे दिसून आल्यावर तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ही लक्षणे साधी असली तरी वेळेत उपचार न घेतल्यास हा आजार जीवघेणाही ठरू शकतो.