पोलीस अधिकाऱ्याला मारहाणप्रकरणी अटकेची शक्यता
विधान भवनाच्या संकुलात पोलीस अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी विधानसभेतील पाच आमदारांना ३१ डिसेंबपर्यंत निलंबित करण्यात आले असून आता या आमदारांना लवकरच अटक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी यांनी सदर पाच आमदारांच्या निलंबनाचा ठराव मांडला आणि तो सभागृहाने आवाजी मतदानाने पारित केला. राम कदम (मनसे), जयकुमार रावल (भाजप), क्षितीज ठाकूर (बहुजन विकास आघाडी), राजन साळवी (शिवसेना) आणि प्रदीप जयस्वाल(अपक्ष) या पाच आमदारांना निलंबित करण्यात आले आहे.
आमदारांच्या निलंबनाची घोषणा करताना पाटील म्हणाले की, आमदारांची कृती गंभीर असून सभागृहाची प्रतिष्ठा मलिन करणारी आहे. निलंबनाच्या कालावधीत या आमदारांना केवळ सभागृहातच नव्हे तर मुंबई आणि नागपूरमधील विधिमंडळाच्या संकुलातही प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे.
विधान भवनाच्या संकुलातील अभ्यागतांच्या गॅलरीबाहेर मंगळवारी सदर पाच आमदारांनी पोलीस अधिकारी सचिन सूर्यवंशी यांना लाथाबुक्क्य़ांनी बेदम मारहाण केली. वांद्रे-वरळी सागरी सेतूवर सोमवारी सूर्यवंशी यांनी क्षितीज ठाकूर यांची गाडी अडविली आणि गाडी वेगाने चालविल्याचा आरोप ठेवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली होती.
क्षितीज ठाकूर यांच्याशी असभ्य वर्तन केल्याचा निषेधार्थ सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले असता प्रेक्षक गॅलरीत बसलेल्या सूर्यवंशी यांनी असभ्य आविर्भाव केले त्यामुळे आमदार संतप्त झाले. मात्र आपण प्रेक्षक गॅलरीत असल्याच्या वृत्ताचा सूर्यवंशी यांनी इन्कार केल्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या कार्यालयातील सूत्रांनी स्पष्ट केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा