मुंबई : माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत डोंबिवलीतील सराईत गुन्हेगार नितीन सप्रे याच्या टोळीचा सहभाग उघड झाला आहे. त्यानुसार, गुन्हे शाखेने सप्रेसह त्याच्या अंबरनाथ आणि पनवेल येथील साथीदारांना अटक केली आहे. आरोपींनी सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपींना शस्त्र पुरविल्याचे उघड झाले आहे. तसेच सिद्दीकी यांचे मारेकरी आरोपींसोबत कर्जत येथे वास्तव्यालाही होते, असे समजते.
डोंबिवलीतील सराईत गुन्हेगार नितीन सप्रे (३२) याच्यासह अंबरनाथमधील संभाजी पारधी (४४), प्रदीप दत्तू ठोंबरे (३७) चेतन दिलीप पारधी (२७) आणि पनवेलमधील राम फुलचंद कानोजिया (४३) यांना अटक करण्यात आली आहे. या टोळीचा सप्रे प्रमुख असून तो अकोटमधील पसार आरोपी शुभम लोणकरच्या संपर्कात होता. नितीनवर हत्या, हत्येचा प्रयत्न, शस्त्रबंदी कायद्यान्वये गुन्हे नोंद आहेत. नितीन हा रामच्या मदतीने त्याची टोळी चालवत होता. शस्त्रासंबंधी तो शुभम लोणकरच्या संपर्कात आला. शुभम पाठोपाठ तो याप्रकरणातील आरोपी मोहम्मद झिशान अख्तरच्या संपर्कात होता. त्यांच्या सांगण्यावरून तो या कटात सहभागी होता. त्याने साथीदारांच्या मदतीने तीन पिस्तुली मारेकऱ्यांना दिल्या. त्या गुन्हे शाखेने जप्त केल्या आहेत.
हेही वाच – जे.जे. रुग्णालयामध्ये प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्याचे रॅगिंग
धर्मराज कश्यप आणि शिवकुमार गौतम उर्फ शिवा हे दोघे नितीन सप्रे व राम कनोजियासोबत ऑगस्ट महिन्यात एक दिवस कर्जतमधील एका झोपडीत वास्तव्याला होते. या टोळीने त्यांना पैसेही पुरवले. पुढे सप्टेंबर महिन्यात आरोपींनी त्यांना शस्त्र पुरवले. त्यांच्या संपर्कात आणखी कोण आहे ? याचा तपास सुरू आहे. उत्तर भारतातून त्यांना शस्त्र मिळाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
अटक आरोपींच्या चौकशीतून या टोळीचा सहभाग स्पष्ट होताच गुन्हे शाखेने तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे या पाच जणांना अटक केली. याप्रकरणी गुन्हे शाखा अधिक तपास करीत आहे. याप्रकरणी आतापर्यंत आठ जणांना अटक करण्यात आली आहे. गोळीबार करणाऱ्यांपैकी धर्मराज कश्यप, गुरमेल सिंह या दोघांना घटनास्थळावरून अटक करण्यात आली होती. तसेच त्यांना मदत करणाऱ्या प्रवीण लोणकरला गुन्हे शाखेने पुण्यातून अटक केली होती. याप्रकरणी गोळीबार करणारा शिव कुमार ऊर्फ शिवा गौतम याच्यासह आरोपींना मदत करणारा मोहम्मद झिशान अख्तर व कटात सहभागी शुभम लोणकर यांचा शोध सुरू असून त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी लुक आऊट सर्क्युलर जारी केले आहे.
हेही वाचा – मुंबईबाहेरील ८१ हजार घरांच्या प्रकल्पाला गिरणी कामागारांचा विरोध
सलमान खान गोळीबार प्रकरणातही सहभागाचा संशय
कश्यप आणि शिवा या टोळीसोबत कर्जतला थांबले होते. कर्जतरून पनवेल जवळ आहे. पनवेलमध्ये सलमान खानचे फार्महाऊस आहे. या टोळीचा सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणात सहभाग आहे का ? याचाही तपास गुन्हे शाखा करीत आहे.