ठाणे परिवहन सभापतिपदाच्या निवडणुकीतील पराभवास जबाबदार धरत ठाण्याचे माजी उपमहापौर मिलिंद पाटणकर यांच्या महापालिकेतील कार्यालयात धुडगूस घालत तोडफोड करणाऱ्या शिवसेना-भाजपच्या पाच कार्यकर्त्यांना नौपाडा पोलिसांनी गुरुवारी अटक केली. त्यांची ठाणे न्यायालयाने जामिनावर सुटका केली आहे.
ठाणे परिवहन सभापतिपदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने शिवसेनेचे सदस्य शैलेश भगत यांना गळाला लावत त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तसेच भाजपचे सदस्य अजय जोशी यांच्या मदतीमुळे शैलेश भगत विजयी झाले. जोशी यांना पाटणकर यांची फूस असल्याचा आरोप करत शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी पाटणकर यांच्या कार्यालयात धुडगूस घातला होता. पाटणकर यांना मारहाणही करण्यात आली होती आणि त्यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली होती. या प्रकरणी महापालिका प्रशासनाने दिलेल्या तक्रारीवरून मालमत्तेचे नुकसान, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी अनोळखी व्यक्तींविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी शिवसेनेचे जगदीश थोरात, सतीश पवार, भाजपचे मुकेश शेलार, रमेश बोवले, ओमकार नाईक या पाच जणांना गुरुवारी अटक केली. या सर्वाना ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्यांची १५ हजार रुपयांच्या रोख जामिनावर सुटका केली, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा