मुंबईः मालाड येथील बहुमजली इमारतीच्या २० व्या मजल्याच्या छताचा काही भाग कोसळून तीन कामगारांचा मृत्यू झाल्याप्रकरणी दिंडोशी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. त्यात कंत्राटदार, दोन अभियंते व दोन पर्यवेक्षकांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला असून तिघे जखमी झाले आहेत.

मालाड येथील हाजी बापू मार्गावरील गोविंद नगरमधील नवजीवन या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत (झोपु) बहुमजली इमारतीचे बांधकाम सुरू होते. गुरुवारी दुपारी १२ च्या सुमारास अचानक २० व्या मजल्याच्या छताचा काही भाग कोसळला. बांधकामस्थळी काम करणारे काही कामगार मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी बचावकार्य हाती घेतले. दुर्घटनेत जखमी झालेल्या सहा जणांना मातीच्या ढिगाऱ्याखालून बाहेर काढून नजिकच्या एम. डब्ल्यू देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी तिघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

हेही वाचा – गणेशोत्सव मंडळाच्या स्वयंसेवकांना ‘सीपीआर’ प्रशिक्षण

हेही वाचा – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडेकोट बंदोबस्त; गणेशोत्सव, ईदच्या पार्श्वभूमीवर विशेष उपाययोजना

याप्रकरणी कैलाश भारुडे (४२), प्रणय पडवळकर (३३), सागर सोनू (३६), सागर रेवरे (३२), आणि मनप्रीत सिंह (४०) यांना पोलिसांनी अटक केली. सिंह हे बांधकाम ठिकाणाचे कंत्राटदार आहेत. इतर दोघे अभियंते आहेत. आरोपींना शुक्रवारी न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.