मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी गोळीबार करणारा मुख्य आरोपी शिवकुमार गौतमसह पाच जणांना सोमवारी न्यायालयाने १९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. मुंबई गुन्हे शाखा आणि उत्तरप्रदेश विशेष कृती दलाने रविवारी शिवकुमार आणि इतर चार जणांना उत्तर प्रदेशमधील बहराईच जिल्ह्यातील नानपारा येथून अटक केली.

शिवकुमार याला आश्रय दिल्याप्रकरणी तसेच नेपाळला पळून जाण्यास मदत केल्याबद्दल अनुराग कश्यप, ज्ञानप्रकाश त्रिपाठी, आकाश श्रीवास्तव आणि अखिलेंद्र प्रताप सिंग या चौघांना अटक करण्यात आली होती. गुन्हे शाखेने आरोपीला अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी विनोद पाटील यांच्यासमोर उपस्थित केले. या प्रकरणातील आर्थिक बाबी तसेच गुन्ह्यादरम्यान वापरण्यात आलेले शस्त्र कसे मिळवले, याची चौकशी करायची असून शिवकुमारला देण्यात आलेल्या पैशांचा स्रोतही तपासण्याची गरज आहे, असे सांगून पोलिसांनी न्यायालयाकडे त्याला पोलीस कोठडी सुनावण्याची मागणी केली. आरोपीचे वकील अमित मिश्रा यांनी, शिवकुमार तपासात सहकार्य करत असल्याचा दावा केला. तसेच, अन्य चौघांवर केवळ शिवकुमारला आश्रय दिल्याचा आणि पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप आहे, असा युक्तिवाद मिश्रा यांनी न्यायालयात केला. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने पाच जणांना १९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

हेही वाचा – मुंबई : पसंतीच्या वाहन क्रमांकांची खरेदी कमी; महसूल जास्त, दोन महिन्यांत १० कोटी रुपयांचा महसूल

हेही वाचा – Mumbai Murder : मुंबईतल्या गोराईमध्ये मृतदेहाचे सात तुकडे आढळल्याने खळबळ, हातावरच्या टॅटूने गूढ वाढवलं

बाबा सिद्दिकी यांची १२ ऑक्टोबर रोजी मुंबईतील वांद्रे पूर्व येथील आमदार झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयाबाहेर तीन हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. त्यांच्या छातीवर दोन गोळ्या लागल्याने उपचारासाठी त्यांना लीलावती रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र, दाखल करण्यापूर्वीच सिद्दिकी यांचा मृत्यू झाला होता.

Story img Loader