मुंबई : टास्क फसवणुकीतून बँकेतील ४३ लाख रुपये काढून सायबर फसवणूक करणाऱ्या पाच जणांना उडीसामधून अटक करण्यात सायबर पोलिसांना यश आले. तसेच, पोलिसांनी याप्रकरणातील ६ लाख ९९ हजार रुपयांची रोकड गोठविली.

सायबर पोलिसांनी या कारवाईत प्रमोदकुमार रवींद्र बेहेरा ( २६ ), राकेशकुमार हरिराम चौधरी (२५), सूर्वेदू निरंकर दास (३०), जयदीप अमरकुमार परिडा (२४), मनोजकुमार अदिचरम राउत (२९) यांना अटक केली. सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदारांना व्हॉटस ॲपद्वारे संपर्क साधून एका सोशल मीडिया मार्केटिंग कंपनीच्या ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंटमधून बोलत असल्याचे सांगण्यात आले. तसेच अर्धवेळ नोकरी देण्याचे आमिषही दाखविण्यात आले. त्यानंतर तक्रारदारांना इंस्टाग्राम खात्याच्या यु.आर.एल. लिंक्स व युझर नेम पाठविण्यात आले. संबंधित इंस्टाग्राम अकाऊंटला फॉलो करून त्याची छायाचित्रे पाठविण्याची सूचना करून तक्रारदारांना टास्क पूर्ण करण्याचे काम देण्यात आले. तक्रारदाराने टास्क पूर्व करताच त्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे, त्यांचा विश्वास बसला. पुढे जास्तीच्या नफ्याचे आमिष दाखवून त्यांना टास्क पूर्ण करताना गुंतवणूक करण्यास भाग पाडण्यात आले. या टोळीच्या जाळ्यात अडकून त्यांनी ४३ लाख ६२ हजार रुपये गुंतवले. मात्र ना नफा मिळाला ना गुंतवलेली रक्कम. अखेर त्यांनी सायबर पोलिसांत धाव घेतली आणि याप्रकरणी तक्रार केली. त्यानुसार, पश्चिम विभाग सायबर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.

हेही वाचा >>>तेजस ठाकरेंचा ‘त्या’ व्हिडीओवरून आशिष शेलारांची टीका; आदित्य ठाकरेंनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले…

तपासात याप्रकरणात उडीसा येथील आरोपींचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तपास पथक तेथे रवाना झाले. त्यांनी, स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपीला अटक केली. त्यांच्याकडून ११ मोबाइल, वेगवेगळ्या बँकांची ४७ पासबुक, २३ वेगवेगळ्या बँकेचे व खात्याचे चेकबुक, १०४ विविध बँकांचे एटीएम कार्ड, १० मोबाइल सिमकार्ड, १ बँक मॅनेजर स्टॅम्प असा मुदद्देमाल हस्तगत केला. तसेच ६ लाख ९९ हजार रुपयांची रोकड गोठविण्यात आली.