झोपडपट्टीमधील पाच विद्यार्थ्यांकडून कचऱ्यापासून ३ हजार किलो खतनिर्मिती
मुंबईतील कचऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस अधिक पेटू लागला असला तरी राजकीय इच्छाशक्ती आणि नागरिकांचे दुर्लक्ष यामुळे या कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करणे आजवर शक्य झालेले नाही. दररोज निर्माण होणारा लाखो किलो कचरा देवनार, मुलुंड येथील कचराभूमीवर साठत जातो. याचा सर्वाधिक त्रास या परिसरातील झोपडपट्टय़ांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना सोसावा लागतो. हाच धागा पकडून देवनार कचराभूमीजवळच्या वस्तीत राहणाऱ्या पाच तरुण-तरुणींनी त्या भागातील कचऱ्याचे वर्गीकरण करून त्यापासून खतनिर्मिती करण्याचा प्रकल्प उभारला. गेल्या चार महिन्यांपासून दररोज सरासरी २० किलो कचरा गोळा करून या मुलांनी आतापर्यंत तब्बल ३ हजार किलो खताची निर्मिती केली आहे.
देवनारच्या कचराभूमीनजीकच्या परिसरात राहत असल्यामुळे कचऱ्यामुळे भविष्यात निर्माण होणाऱ्या समस्येचे गांभीर्य या विद्यार्थ्यांना उमगले. आपल्या भागातील कचऱ्याचे डोंगर पाहून राहुल रायपुरे, रमेश साळवे, अर्चना इल्ले, सरिता नखाते, आकाश सपकाळ हे तरुण अस्वस्थ होत होते. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतरही नोकरीत असताना त्यांना कचऱ्याचा प्रश्न सतावत होता. त्यामुळे त्यांच्यातील एक-दोघांनी नोकरी सोडून स्वत:ला पूर्णपणे कचरा व्यवस्थापनाच्या कामास झोकून द्यायचे ठरवले, तर इतर मुले नोकरी करून या उपक्रमासाठी आर्थिक साहाय्य करीत आहेत. डॉ. शरद काळे यांच्या मार्गदर्शनाखाली या तरुणांनी बास्केट प्रकल्पाला सुरुवात केली.
साठे नगर भागातील विलास गोपळे चाळ आणि देवनार कॉलनीजवळील लल्लुभाऊ कम्पाऊंडमधील सिंधू सोसायटीच्या इमारतीमधील ४४ कुटुंबांच्या घरातील कचरा गोळा करून या प्रकल्पाला सुरुवात केली. यासाठी या मुलांनी झोपडपट्टीमधील लोकांना कचरा व्यवस्थापनाचे महत्त्व पटवून दिले. या प्रकल्पासाठी ही मुले लोकांच्या घराघरांतून जाऊन कचरा जमा करीत आहेत, तर कधी भाजीच्या दुकानात जाऊन उरलेल्या भाज्यांची देठे, पाने, साली जमा करुन त्याचा उपयोग खतनिर्मितीसाठी करीत आहेत. खतनिर्मितीसाठी कचऱ्यामधील घटकांचे हाताने तुकडे करून एका बास्केटमध्ये जमा केले जाते. काही दिवसांनंतर कचऱ्याला ओलावा आल्यानंतर हे खत तयार होते. यासाठी ही मुले स्वत:च्या हाताने कचऱ्यामधील घटकांचे तुकडे करतात. या प्रकल्पासाठी साठे नगरमध्ये एक खोली भाडय़ाने घेण्यात आली असून तेथे बास्केट प्रकल्प राबविला जात आहे. गेल्या चार महिन्यांत या तरुणांनी दररोज १० ते ३० किलो कचरा जमा करीत एकूण ३ हजार किलो खतांची निर्मिती केली आहे. काही महिन्यांपूर्वी या तरुणांनी ऑल राऊंडर नावाची संस्था सुरू केली आहे. या मुलांमधील कोणाची आई घरकाम करते, तर कोणाची आई मासे विकते. घरची परिस्थिती हलाखीची असताना स्वत:ची नोकरी सोडून या मुलांनी पूर्णवेळ कचरा व्यवस्थापनाच्या कामासाठी वाहून घेतले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पालिकेचा विरोध
‘सर्वसामान्य माणसे कचऱ्याचे खत घेण्यासाठी तयार होत नाहीत. अशा वेळी आम्ही सुमारे २ हजार किलो खत मोफत विकले आहे,’ अशी माहिती राहुल रायपुरे याने दिली. ‘या प्रकल्पासाठी आम्ही महापालिकेची मदत मागितली असता त्यांनी विरोध केला आणि तुमचा त्रास झाला तर संस्था बंद करण्यात येईल, असे म्हणत आम्हाला दमदाटी केली,’ असेही तो म्हणाला. ‘आम्ही आमच्या पातळीवर हा उपक्रम सुरू केला आहे, मात्र तो मुंबईतील सर्व नागरिकांनी केला तर काही प्रमाणात कचऱ्याचा प्रश्न नक्की सुटेल,’ असा आशावाद त्याने व्यक्त केला आहे.