स्वस्त आणि मस्त या गुणांवर आधारित विपणन तंत्रज्ञानामुळे देशभरात मोठय़ा प्रमाणावर इलेक्ट्रॉनिक्स वस्तू येत आहेत. या वस्तू वापरा आणि फेकून द्या यावर आधारित असतात. यामुळे वस्तूचा उपयोग संपला की ती एकतर घरात पडून राहते नाहीतर कचऱ्यात जाते. पण यातील अनेक भागांचा पुनर्वापर शक्य असून या कचऱ्याचे योग्य नियोजन होणे गरजेचे आहे. यामुळेच ई-कचरा व्यवस्थापनासाठी सध्या अनेक कंपन्या आणि संस्था पुढाकार घेऊ लागल्या आहेत. यातील एका कंपनीने नुकतेच मुंबईत पाच हजार ई-कचरापेटय़ा उभारण्याची मोहीम हाती घेतली आहे. इतकेच नव्हे तर हा कचरा गोळा करण्यासाठी तीन लाख भंगारवाले, रद्दीवाले आणि कबाडीवाल्यांना प्रशिक्षणही देण्यात येणार आहे.
सध्या भारतात ई-कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी पुरेशी यंत्रणा नसल्याने ई-कचऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस भेडसावू लागला आहे. सध्या देशभरात तब्बल ३.२ लाख एमटी कचरा असून येत्या पाच वर्षांत हाच कचरा २० लाख एमटीपर्यंत वाढण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे देशभरात येत्या काही वर्षांत एकूण एक लाख ई-कचरापेटय़ा उभारण्याचा मानस ईको रिसायकल मर्यादित संस्थेचा असणार आहे. या मोहिमेअंतर्गत रोजच्या घरगुती आणि व्यावसायिक वापरातील कालबाह्य़ किंवा मोडलेल्या विद्युत तसेच इलेक्ट्रॉनिक वस्तू ई-कचरापेटय़ांमध्ये जमा करण्यात येणार आहेत. यासाठी शाळा, महाविद्यालय आणि धार्मिक स्थळे येथे ई-कचरापेटय़ा ठेवण्यात येणार आहेत. या कचरापेटय़ांत गोळा झालेल्या ई-कचऱ्याची शास्त्रशुद्ध पद्धतीने विल्हेवाट लावण्यात येईल. या प्रयोगामुळे पर्यावरणाचा ऱ्हास थांबेल, शिवाय यातून मिळणारे उत्पन्न समाजिक कामासाठी वापरता येईल असा दावा या संस्थने केला आहे.
यात ईको रिसायकल मर्यादित या कंपनीने ‘ईकोरेको एनवायरो शिक्षण’ या कार्यक्रमाअंतर्गत तीन लाख भंगारवाले, रद्दीवाले आणि कबाडीवाले यांना एकत्रित ई-कचरा हाताळण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामुळे त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यासह आरोग्य उत्तम राहण्यास मदत होईल, असे ईको रिसायकल मोहिमेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक बी. के. सोनी यांनी सांगितले. ई-कचऱ्याची शास्त्रशुद्ध पद्धतीने विल्हेवाट लावण्याच्या मोहिमेसाठी खासगी कंपनीच्या उद्योजकांना आवाहन करण्यात आले आहे. खासगी कंपन्यांचा सहभाग घेतल्याने ई-कचऱ्याचा प्रश्न लवकर सुटेल. याशिवाय पर्यावरणाचा ऱ्हासही कमी होईल, असा विश्वास सोनी यांनी व्यक्त केला.

Story img Loader