मुंबई : MHADA Houses Pune म्हाडाच्या पुणे मंडळाने पाच हजार घरांची सोडत काढण्याचा निर्णय घेतला असून या सोडतीची जाहिरात ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर तात्काळ अर्ज विक्री – स्वीकृतीच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात येणार आहे. तसेच ऑक्टोबरमध्ये या घरांसाठी सोडत काढण्यात येणार आहे. दरम्यान, या वर्षातील ही दुसरी सोडत आहे.
म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या ४,०८२ घरांच्या सोडतीचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लवकरच कोकण, पुणे आणि औरंगाबाद मंडळांतील घरांसाठी सोडत काढण्यात येईल असे जाहीर केले. त्यानुसार पुणे मंडळातील पाच हजार घरांसाठी ऑक्टोबरमध्ये सोडत काढण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मंडळाचे मुख्य अधिकारी अशोक पाटील यांनी दिली.
हेही वाचा >>> कोकण, पुणे, औरंगाबादमधील १० हजार घरांसाठी ऑक्टोबरमध्ये सोडत
या सोडतीच्या जाहिरातीची तयारी पूर्ण झाली असून २५ ऑगस्ट रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले. जाहिरात प्रसिद्ध होताच २५ ऑगस्टपासूनच अर्ज विक्री – स्वीकृतीला सुरुवात करण्यात येणार आहे. या सोडतीत अत्यल्प, अल्प, माध्यम आणि उच्च अशा सर्व उत्पन्न गटातील घरांचा समावेश आहे. त्याचबरोबर पुणे, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर येथील घरांसाठीही सोडत काढण्यात येणार आहे.