सुशांत मोरे
वाहन योग्यता प्रमाणपत्राविना रस्त्यांवर वाहतूक; चाचणीसाठी नवी मुंबईत जाण्यास संघटनांचा नकार
मुंबई महानगर क्षेत्रात धावणाऱ्या जवळपास पाच हजार काळ्या-पिवळ्या टॅक्सींमधील प्रवाशांचा प्रवास सध्या धोकादायक ठरू शकतो. वहनयोग्यता प्रमाणपत्रासाठी ब्रेक चाचणी पथ (ब्रेक टेस्ट ट्रॅक) मुंबईतील आरटीओत नसल्याने नवी मुंबईतील आरटीओत चाचणीसाठी जाण्याची सूचना परिवहन विभागाकडून करण्यात आली आहे. मात्र त्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने टॅक्सीचालकांनी नवी मुंबईतून चाचणी करून घेण्यास नकार दिला आहे.
रिक्षा, टॅक्सी, खासगी बस, बेस्ट बस यासह अन्य व्यावसायिक वाहनांनी आरटीओकडून वार्षिक वहनयोग्यता तपासणी (फिटनेस) करून घेणे आवश्यक असते. मुंबईतील सर्व आरटीओत मिळून दररोज जुन्या १,५०० तर नवीन ४०० ते ५०० वाहनांची योग्यता प्रमाणपत्र तपासणी केली जाते. त्यासाठी प्रत्येक आरटीओत २५० मीटरचा चाचणी ट्रॅक असावा लागतो. मात्र मुंबईत असा चाचणी पथ उपलब्ध नाही. यासंदर्भात आलेल्या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने चाचणी पथ नसलेल्या ठिकाणी वहन योग्यता प्रमाणपत्र देण्यास मज्जाव केला आहे. त्यामुळे २९ सप्टेंबरपासून मुंबईतील ताडदेव, वडाळा, अंधेरी, बोरिवली आरटीओत वाहनांची तपासणी थांबलेली आहे. परिवहन विभागाने मुंबईतील व्यावसायिक वाहनांसाठी वाशी, पनवेल, ऐरोली आरटीओत वहनयोग्यता तपासणीचा पर्याय दिला आहे.
परंतु वाशी, पनवेल, ऐरोली येथे जाण्यास मुंबई टॅक्सीमेन्स युनियन व मुंबई टॅक्सी असोसिएशनने स्पष्टपणे नकार दिला आहे. मुंबईतील काळ्या-पिवळ्या टॅक्सींना चाचणीसाठी नवी मुंबईत गेल्यास इंधन, टोल याचा नाहक भरुदड पडतोच. शिवाय बराच वेळही खर्ची करावा लागतो. तसेच प्रमाणपत्र नसल्यास पोलिसांकडून कारवाईदेखील होते. त्यामुळे टॅक्सींची ब्रेक टेस्ट ही मुंबईमध्येच घेण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्याकडे करण्यात आली आहे.
वहनयोग्यता प्रमाणपत्राच्या चाचणीसाठी वाहनचालकांना नवी मुंबईतील आरटीओत पर्याय दिला आहे. त्यामुळे काळी-पिवळी टॅक्सीचालक तेथे जातील अशी अपेक्षा आहे. मुंबईतील आरटीओसाठी नवीन चाचणी पथाचा प्रश्न एक ते दोन महिन्यांत सुटेल.
– शेखर चन्ने, राज्य परिवहन आयुक्त
मुंबईतील टॅक्सीचालकांना नवी मुंबईत वाहन चाचणीसाठी गेल्यास नाहक भरुदड पडतो. त्यासाठीच चालक जाण्यास नकार देत आहेत. जोपर्यंत ट्रॅक उपलब्ध होत नाही, तोपर्यंत नवी मुंबई किंवा अन्य ठिकाणी चाचणीसाठी जाणार नाही, ही आमची भूमिका आहे.
– ए. एल. क्वाड्रोस, महासचिव, मुंबई टॅक्सीमेन्स युनियन