बोरिवलीच्या राजेंद्रनगर येथील पाच झाडे सुकून मरण पावली आहेत. विषप्रयोग करून या झाडांना मारण्यात आल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. तक्रार करूनही पालिकेने काहीच उपाययोजना केली नाही, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

बोरिवली येथील राजेंद्रनगर परिसरातील पाच मोठय़ा झाडांवर विषप्रयोग झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. काही कामगार २६ डिसेंबरच्या रात्री या झाडांवर यंत्राच्या साहाय्याने छिद्र पाडत होते. दुसऱ्या दिवशी झाडातून पांढरा फेस येत होता. त्यानंतर झाडे सुकू लागली. पाचपैकी चार झाडे पूर्ण सुकली तर एक झाड मृत्युमुखी पडले, असे स्थानिक रहिवासी आणि नदी संवर्धन प्रकल्पाचे समन्वयक विक्रम चोगले यांनी सांगितले. याप्रकरणी पालिका आणि स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. मात्र काहीच कारवाई झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.

पालिकेकडे तक्रार केल्यानंतर ११ दिवसांनी पालिकेची माणसे आली. त्यांनी झाडांना खत, माती आणि पाणी घातले. मात्र त्याचा काहीच फायदा झाला नाही. महापालिकेच्या उद्यान विभागात वनस्पतीतज्ज्ञ नाही. हा पालिकेचा हलगर्जीपणा आहे, असा आरोपही त्यांनी केला.

झाडावर एकूण १२ छिद्रे पाडण्यात आली होती, असे ‘मिशन ग्रीन मुंबई’चे प्रमुख सुभजित मुखर्जी यांचे म्हणणे आहे. मुंबईतील ज्या जागा पुनर्विकासात जाणार आहेत, त्या ठिकाणी अशा प्रकारे झाडे मारली जाण्याचे प्रकार मोठय़ा प्रमाणात होत असतात, असाही आरोप त्यांनी केला. अधिकृतरीत्या झाड हटवण्यासाठी २० हजार रुपये भरावे लागतात. तसेच एका झाडामागे पाच झाडे लावावी लागतात. हे सर्व टाळण्यासाठी अशा प्रकारे झाडांना विष घालून मारले जाते, असे मुखर्जी म्हणाले.

या प्रकरणाची तक्रार आल्यानंतर आम्ही पाहणी केली. नेमका झाडांचा मृत्यू कशामुळे झाला त्याचा अहवाल अजून आलेला नाही, मात्र वरकरणी विषप्रयोग झाल्याचे दिसून येत आहे. आम्ही पोलिसांत तक्रार दाखल केली आहे, अशी माहिती पालिकेच्या उद्यान विभागाचे अधीक्षक आणि वृक्ष अधिकारी जितेंद्र परदेशी यांनी दिली.