‘नॅशनल एलिजिबिलीटी कम एन्ट्रन्स टेस्ट’मुळे (नीट) निर्माण झालेला घोळ आणि खासगी संस्थाचालकांना दोन केंद्रीय प्रवेश फेऱ्यांनंतर उर्वरित जागा संस्थास्तरावर भरण्यासाठी मिळालेली मोकळीक या दोन गोष्टी पथ्यावर पडल्याने या वर्षी वैद्यकीय व दंत वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या जागांच्या खरेदीविक्रीचे रॅकेट कधी नव्हे इतके सक्रीय झाले आहे.
प्रवेशेच्छुक विद्यार्थी हेरून त्यांना व पालकांना सूचक एसएमएस पाठवून गळाला लावण्याचे पद्धतशीर प्रयत्न दलालांमार्फत होत आहेत. या रॅकेटचे केंद्र दिल्लीत असून एसएमएसमध्ये दिल्या जाणाऱ्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधणाऱ्या पालकांना लाखो रुपयांच्या मोबदल्यात राज्यातील नामवंत खासगी महाविद्यालये, अभिमत विद्यापीठांमध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमांचे प्रवेश करून देण्याचे आश्वासन दिले जात आहे. इतकेच नव्हे तर राज्यातील खासगी संस्थाचालकांमार्फत व अभिमत विद्यापीठांकडून घेतल्या जाणाऱ्या सीईटीचे निकालही आम्ही ‘मॅनेज’ करतो असेही या दलालांमार्फत सांगितले जात असल्याची धक्कादायक माहिती आहे.
एमबीबीए, बीडीएस अभ्यासक्रमांचे प्रवेश सीईटीमार्फत केंद्रीय प्रवेश प्रक्रियेद्वारे करणे बंधनकारक असतानाही ‘असो-सीईटीतील खासगी महाविद्यालये, बीव्हीपी, बीव्हीपी, डी.वाय.पाटील, कृष्णा, एमएजीएम, प्रवरा आदी अभिमत विद्यापीठांमधील जागा आत्ताच निश्चित करा’, ‘पैसे थेट महाविद्यालयाकडे भरा’, ‘कमीत कमी पॅकेजसाठी अमुक नंबरवर संपर्क साधा’, ‘महाराष्ट्रातील कुठल्याही खासगी महाविद्यालयात बीडीएस-एमबीबीएसची जागा निश्चित करा,’ अशी आश्वासने देणाऱ्या एसएमएसचा मारा गेले आठवडाभर प्रवेशेच्छुक विद्यार्थी व पालकांच्या सेलफोनवर होत आहे.
या रॅकेटच्या विरोधात काही पालकांनी ‘फोरम फॉर फेअरनेस इन एज्युकेशन’ या स्वयंसेवी संस्थेकडे तक्रार केली आहे. ‘गेल्या वर्षीही या प्रकारचे एसएमएस पालकांना येत होते. पण, या वर्षी त्यांचा धडाका खूप जास्त आहे,’ अशी तक्रार फोरमचे अध्यक्ष जयंत जैन यांनी केली. गेल्या वर्षीपासून हे रॅकेट सक्रीय होण्याची काही कारणे आहेत. त्यापैक एक कारण म्हणजे खासगी संस्थाचालकांना चाप बसविण्यात राज्य सरकारने दाखविलेल्या नाकर्तेपणात आहे, अशी टीका त्यांनी केली. आम्ही या प्रकाराची तक्रार पोलिसांकडे करणार असल्याची माहितीही जैन यांनी दिली.