भंडारा जिल्ह्य़ातील मुरमाडी-लाखनी येथील तीन अल्पवयीन मुलींवर बलात्कार व हत्या प्रकरणी संवेदनाशून्य असलेल्या सरकार आणि गृहमंत्री आर.आर. पाटील यांचा निषेध करण्यासाठी भाजप महिला मोर्चा येत्या सोमवारी प्रत्येक जिल्ह्य़ात ‘मशाल मोर्चा’ आयोजित केला आहे. कायदा व सुव्यवस्था नावालाही शिल्लक नसून सरकार बरखास्तीची मागणी भाजप करणार आहे. तीन मुलींना पळवून नेल्यानंतर त्याची तक्रार नोंदविण्यासाठी पोलिस ठाण्यात गेलेल्या त्यांची आई व आजी यांना रात्री ९ ते दीड वाजेपर्यंत पोलिस ठाण्यात बसवून ठेवण्यात आले. आरोपींना अजूनपर्यंत पकडण्यात आलेले नाही. भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी आणि महिला मोर्चाच्या अध्यक्षा नीता केळकर यांनी या मुलीच्या कुटुंबियांची शुक्रवारी भेट घेतली. जनतेमध्ये तीव्र संताप असून या परिसरात पोलिसांची आता छावणी असताना सात घरफोडय़ा झाल्या. जि.प.शिक्षकाने पादगाव (लाखणी) येथे २० फेब्रुवारीला १४ वर्षांच्या विद्यार्थिनीवर  बलात्कार केला. यावरुन पोलिस व गृहखाते काय करीत आहे, हे दिसून येते. त्यामुळे सुरक्षिततेसाठी महिलांना आता चुलीतील लाकडे हातात घेऊन रस्त्यावर आल्याशिवाय पर्याय उरलेला नाही. त्यासाठी मशाल मोर्चा आयोजित केल्याचे केळकर यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा