दिवा भागात अधिकृत इमारत उभारत असल्याची बतावणी करून अनधिकृत इमारतीमधील घरांची विक्री करणाऱ्या चार जणांविरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यामध्ये बिल्डर आणि जागा मालक यांचा समावेश आहे. या चौकडीचा पोलीस शोध घेत आहेत. तसेच या चौकडीने सुमारे २० ग्राहकांची फसवणूक केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
बिल्डर हरीश पटेल, योगेश चोडलेकर, राजेश्री चोडलेकर आणि जागा मालक इंद्रपाल पाटील या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चौकडीने ठाणे महापालिकेचा बांधकाम करण्याचा परवाना नसतानाही तो असल्याचे भासविले. तसेच बांधकाम व्यावसायिक असल्याची बतावणी केली. त्याचप्रमाणे दिवा भागातील मोकळा भूखंड दाखवून त्यावर बांधकाम सुरू केले व त्यातील घरांच्या बुकिंगसाठी दिव्यात राहणारे मुकुंद कृष्णराव जावळे यांच्यासह १९ जणांकडून पैसे घेतले. मात्र, ही इमारत अनधिकृतपणे उभारत असल्याने ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण पथकाने तिच्यावर कारवाई केली. त्या वेळी आपली फसवणूक झाल्याचे मुकुंद यांच्यासह १९ ग्राहकांच्या लक्षात आले. ७ फेब्रुवारी २०११ पासून आतापर्यंत या कालावधीत त्यांची फसवणूक झाली आहे. या प्रकरणी मुकुंद यांनी दिलेल्या तक्रारीवरून या चौकडीविरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा शोध सुरू आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण सोंडे यांनी दिली.

Story img Loader