मंगल हनवते, लोकसत्ता

मुंबई : म्हाडाची घरे खासगी विकासकांच्या तुलनेत स्वस्त असली तरी उत्पन्न गटाची मर्यादा आणि घरांच्या किमतींत बरीच तफावत आहे. याचा फटका मुंबई मंडळाच्या १४ ऑगस्ट रोजी काढलेल्या सोडतीतील विजेत्यांना बसल्याचे उघडकीस आले आहे. या ४ हजार ८२ घरांच्या सोडतीतील ३९८ विजेत्यांनी मंडळाला घरे परत (सरेंडर) केली आहेत. यात अत्यल्प गटातील २२४, तर, उच्च गटातील ५० टक्क्यांहून अधिक म्हणजे ६४ घरे विजेत्यांनी नाकारली आहेत. किमती आवाक्याबाहेर असून गृहकर्ज उपलब्ध होत नसल्याचे कारण देत अनेकांनी घरे परत केल्याची चर्चा आहे.

सोडतीत एक लाख २२ हजार जणांनी अर्ज भरले होते. यापैकी  ४ हजार ७८ जण विजेते ठरले. सोडतीनंतर मंडळाने अवघ्या दोन दिवसांतच विजेत्यांना स्वीकृतीपत्र पाठविले. या पत्रानुसार ३९८ विजेत्यांनी घरे परत केल्याची माहिती मुंबई मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

हेही वाचा >>> जयस्वाल यांच्या नियुक्तीविरोधातील याचिका फेटाळली

दरम्यान, एकापेक्षा अधिक घरे लागलेल्यांची संख्या जास्त असल्याचे समजते. मात्र असे असले तरी घरे नाकारणाऱ्यांची संख्या मोठी आहे. १६९ विजेत्यांना दोन घरे, २३ विजेत्यांना तीन घरे, दोन विजेत्यांना चार घरे तर दोन विजेत्यांना पाच घरे लागली होती. ही संख्या एकूण २०६ असल्याने उर्वरित १९२ घरेही परत करण्यात आली आहेत.  कर्ज मिळाले तरी त्याची परतफेड करणे वा समान मासिक हप्ता भरणे कठीण होत आहे.  या सोडतीत अत्यल्प गटातील २,७९० घरांचा समावेश असून त्यातील २२४ घरे परत करण्यात आली आहेत. तर, अल्प गटातील १०३४ पैकी ६५, मध्यम गटातील १३९ पैकी ४५ व उच्च गटातील १२० पैकी ६४ घरे विजेत्यांनी नाकारली आहेत. अत्यल्प गटात २४ लाख ७१ हजारांपासून ४० लाखांपर्यंतच्या घरांचा समावेश आहे. पंतप्रधान आवास योजनेतील सर्वाधिक घरांचा त्यात समावेश आहे. तर, अत्यल्प गटातील घरांना चांगला प्रतिसादही मिळाला. मात्र आता हीच घरे विजेत्यांना आवाक्याबाहेर वाटत आहेत. अत्यल्प गटातील २२४ जणांनी घरे परत केली आहे. त्याच वेळी या सोडतीत कोटय़वधींच्या घरांचाही समावेश होता. अगदी दीड कोटी रुपयांपासून थेट साडेसात कोटी रुपयांपर्यंतची घरे आहेत. बाजारभावाच्या तुलनेत म्हाडाच्या किमती कमी असल्याने ही घरे विकली जातील असे वाटत असतानाच मध्यम गटातील ५४ आणि उच्च गटातील ६४ घरे विजेत्यांनी ती नाकारली आहेत.

७० घरांची स्वीकृतीच नाही

एकूण ४,०७८ विजेत्यांपैकी ७७ विजेत्यांनी खोटी माहिती दिल्याने त्यांना नोटीस बजावण्यात आली असून त्यांच्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. तर दुसरीकडे ७० विजेत्यांनी स्वीकृती पत्रेच सादर केलेले नाही. त्यामुळे आता नियमानुसार त्यांचे घर मंडळाला रद्द करावे लागणार आहे. या अनुषंगाने ४६८ घरे रद्द  करण्यात येणार आहेत. आता या घरांसाठी प्रतीक्षा यादीवरील विजेत्यांना संधी देण्यात येईल आणि त्यामुळे घरे शिल्लक राहणार नाहीत, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

Story img Loader