टॅब कॅबपाठोपाठ मेरूकडून अंतिम भाडय़ावर सवलत; टॅबच्या १७०० पैकी केवळ ९०० गाडय़ांच रस्त्यावर
प्रवासी भाडय़ातील लवचीकता आणि एका क्लिकवर उपलब्ध होणाऱ्या ओला, उबेर या अ‍ॅपआधारित टॅक्सी सेवेचा फटका काळ्यापिवळ्या टॅक्सींप्रमाणेच वातानुकूलित सेवा पुरवणाऱ्या फ्लिट टॅक्सींलाही बसतो आहे. धंदा बसल्याने आणि वाहनचालकांनी पाठ फिरविल्याने गेल्या वर्षभरात टॅब कॅबच्या १७०० टॅक्सींपैकी केवळ ९०० गाडय़ाच सध्या रस्त्यावर धावत आहेत. या टॅक्सींचे प्रमाण ४५ टक्क्य़ांनी घटले आहे. त्यामुळे धंदा सावरण्यासाठी टॅब कॅबकडून ‘सिटी टॅक्सी’ची योजना आणली जात आहे. तर टॅब कॅबच्याप्रमाणेच मेरू कॅब कंपनीनेही १ जुलैपासून अंतिम भाडय़ावर २५ टक्के सवलत देण्यास सुरुवात केली आहे.
गेल्या दोन वर्षांपूर्वीपर्यंत (पान १वरून) टॅब कॅब, मेरू आणि टॅक्सी फॉर शोअर या कंपनींच्या सुमारे ५ हजारांहून अधिक टॅक्सी रस्त्यावर धावत होत्या. मात्र सध्या यातील बहुतांश गाडय़ा गोदामात तसेच एकाच जागी पडून असल्याचे पाहायला मिळत आहे. तर अनेक गाडय़ा प्रादेशिक परिवहन विभागाच्या परिसरात धूळखात पडल्या आहेत. यात कंपनीचे करोडो रुपयांचे नुकसान होत असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे टॅब कॅबने काही महिन्यांपूर्वी ‘आनंदयात्री’ सेवेअंतर्गत सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत अंतिम भाडय़ावर १० टक्के सवलत देणे सुरू केले. आता त्याचप्रमाणे ४५० कोटींहून अधिक रुपयांची उलाढाल असलेल्या मेरू कॅबनेही आता ‘आनंदयात्री’ सेवेअंतर्गत अंतिम भाडय़ावर तब्बल २५ टक्के सवलत देण्यास सुरू केले आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत आम्हाला २० टक्क्यांनी फायदा झाला आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वी ज्या वेळी भाडेवाढ करण्यात आली तेव्हा मेरू कॅबकडून भाडेवाढ करण्यात आली नाही. मात्र सध्या प्रवाशांच्या सोयीसाठी ‘आनंदयात्रा’ ही योजना सुरू केली आहे. यात प्रवाशांना अंतिम भाडय़ावर २५ टक्के सवलत देण्यात आली आहे.
-सिद्धार्थ पाहवा, मुख्य कार्यकारी अधिकारी, मेरू कॅब

टॅब कॅबला फटका!
टॅब कॅब कंपनीची गाडी एखाद्या व्यक्तीने काही ठरावीक वेळेकरिता चालवण्यासाठी घेतल्यास त्या चालकाला प्रति दिन १३०० रुपये कंपनीला द्यावे लागतात. यात पेट्रोलचा खर्चही चालकाला करवा लागतो. मात्र गाडी बंद राहिल्यासही १३०० रुपये द्यावे लागतात. टॅब कॅबने प्रवास करताना पहिल्या चार कि.मी.साठी प्रवाशांना ९० ते ११२ रुपये मोजावे लागतात. तर चार कि.मी.नंतर २२ ते २७ रुपये प्रति कि.मी. मोजावे लागतात. हे दर ओला आणि उबेर टॅक्सींच्या तुलनेत अधिक असल्याने टॅब कॅबकडे प्रवासी पाठ फिरवत असल्याचे टॅब कॅबच्या एका व्यवस्थापकाने सांगितले.

Story img Loader