मुंबई : शिर्डी येथील साईबाबा विमानतळावर रात्रीही विमानांचे उड्डाण आणि आगमनास (नाइट लँडिंग) हवाई वाहतूक महासंचालकांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे शिर्डीला दर्शनासाठी जाणाऱ्या साईभक्तांची आता मोठी सोय होणार आहे.
शिर्डीला हवाई, रेल्वे आणि रस्ते मार्गाने जाणाऱ्या भक्तांसाठी गेल्या काही दिवसांमध्ये मोठय़ा सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी हा टप्पा पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते नुकताच सुरू करण्यात आला. त्यापाठोपाठ मुंबई ते शिर्डी अशी वंदे भारत एक्स्प्रेस सुरू झाली आणि आता विमानांसाठी नाइट लँडिंगचा परवाना मिळाला आहे.
काकड आरती मिळणार
आता नाइट लँडिंगची सवलत प्राप्त झाल्याने पहाटेच्या काकड आरतीला उपस्थित राहू इच्छिणाऱ्यांना रात्री प्रवास करून येता येणार आहे. एकूणच भाविकांना मोठय़ा सुविधा यामुळे निर्माण होणार आहेत. साधारणत: मार्च किंवा एप्रिलपासून रात्रीची ही विमानसेवा सुरू होईल. सध्या शिर्डीला १३ विमानसेवा आहेत.