मुंबई : मुंबईतील छोट्या – मोठ्या नाल्यांमधील तरंगत्या कचऱ्यापुढे मुंबई महापालिका प्रशासन हतबल झाले आहे. नागरिकांनी टाकलेला कचरा नाल्यात तरंगत राहतो व त्यामुळे नाले तुंबतात. या कचऱ्यामुळे अतिवृष्टीच्या वेळी पाणी तुंबण्याच्या घटना घडतात. नाल्यातून गाळ काढण्याच्या कामातही तरंगता कचरा अडथळा ठरत आहे. या समस्येवर मुंबई महापालिकेला गेल्या कित्येक वर्षात तोडगा काढता आलेला नाही. नागरिकांनी नाल्यांमध्ये कचरा न टाकता तो कचराकुंडीत टाकावा, असे आवाहन मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी केले आहे.

पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून मुंबईतील मोठ्या व लहान नाल्यांमधून गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. नाल्यांमधील गाळ काढण्यासाठी निविदा प्रक्रियेनंतर शहर आणि उपनगरांसाठी २३ कंत्राटदारांची निवड करण्यात आली आहे. महानगरपालिकेने कंत्राटांमध्ये यंदा अधिक कडक अटी व शर्तींचा समावेश केला आहे. मात्र तरीही नाल्यातील तरंगता कचरा ही मुंबई महापालिकेपुढची मोठी समस्या आहे. कचऱ्यामुळे पाणी तुंबण्याच्या घटना घडतात.

नाल्यातून गाळ काढण्याच्या कामातील हा सर्वात मोठा अडथळा ठरत आहे. अनेक भागातील नाले नियमितपणे स्वच्छ केल्यानंतरही त्यात पुन्हा कचरा टाकण्याचे प्रकार थांबत नाहीत. नागरिकांनी नाल्यांमध्ये कचरा न टाकता तो कचराकुंडीतच टाकावा. जेणेकरून कचऱ्यामुळे नाले तुंबणार नाहीत, पाण्याचा प्रवाह सुरळीत सुरू राहील, असे आवाहन भूषण गगराणी यांनी केले आहे.

पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून मुंबई महानगरातील नदी, लहान-मोठ्या नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे वेगाने सुरू आहेत. भूषण गगराणी यांनी पश्चिम उपनगरात नालेसफाईची कामे सुरू असलेल्या विविध ठिकाणांना मंगळवारी भेट दिली. तसेच, नदी व नाल्यांतून गाळ काढण्याच्या कामांची पाहणी करून संबंधितांना आवश्यक ते निर्देश दिले. पर्जन्य जलवाहिन्या विभागातील संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.

नालेसफाई, गाळ काढण्याची कामे समाधानकारकरित्या होत असली तरी आजुबाजूच्या वस्त्यांमधील नागरिक प्लास्टिक व इतर टाकाऊ वस्तू नाल्यांमध्ये टाकतात. नाल्याच्या दुतर्फा राहणारे रहिवासी, तसेच इतर नागरिकांनी नाल्यांत घनकचरा, टाकाऊ वस्तू, प्लास्टिक वस्तू टाकू नये, महानगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन गगराणी यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना केले.

४३ टक्के गाळ काढला

नाल्यांतून गाळ काढण्याच्या पावसाळापूर्व उद्दिष्टापैकी ४३ टक्के कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित एक महिन्याच्या कालावधीत गाळ काढण्याची कामे वेगाने पूर्ण केली जातील. गाळ काढण्याच्या कामात यंदा अधिक पारदर्शकता आणली आहे. गाळ उपसा संदर्भात प्राप्त होणाऱ्या सर्व चित्रफीतींचे कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीच्या मदतीने महानगरपालिका प्रशासनाकडून विश्लेषण केले जात आहे. त्यानिमित्ताने या कामांमध्ये पहिल्यांदाच कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) प्रणालीचा वापर करण्यात येत आहे. त्याद्वारे नाल्यातील गाळ उपसा करण्याच्या कामांची योग्य देखरेख करणे, कामांमध्ये संपूर्ण पारदर्शकता राखणे यासाठी प्रशासनाला मदत होत आहे, अशी माहिती गगराणी यांनी दिली.