वरळी-वांद्रे सी लिंक जवळ नुकत्याच सुरु झालेल्या फ्लोटिंग क्रूझ रेस्टॉरंटला शुक्रवारी जलसमाधी मिळाली आहे. दुपारी दीडवाजण्याच्या सुमारास ही दुर्देवी घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. क्रूझवरील सर्व १५ कर्मचाऱ्यांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे.

वांद्रे-वरळी सी लिंकजवळ नुकतेच एआरके डेक बार हे फ्लोटिंग रेस्टॉरंट सुरु करण्यात आले होते. दुपारी एकच्या सुमारास समुद्राच्या लाटांचे पाणी क्रूझच्या आत शिरल्यामुळे बोटीला जलसमाधी मिळाली.

पाणी आत शिरण्यास सुरुवात झाल्यानंतर जवळ उभ्या असलेल्या स्थानिक मच्छीमार बोटी आणि जीवरक्षकांनी एआरके डेक बारवर अडकलेल्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढलं. फ्लोटिंग रेस्टॉरंटला अशा प्रकारे जलसमाधी मिळणे हा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासाठी सुद्धा एक झटका आहे. कारण मुंबईच्या समुद्रात फ्लोटिंग रेस्टॉरंट हे गडकरींचे ड्रीम प्रोजेक्ट आहे.

मुंबईच्या समुद्रात अशा प्रकारे बोट बुडाल्यामुळे फ्लोटिंग हॉटेलच्या सुरक्षिततेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. घटनेच्यावेळी कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त अन्य प्रवासी या बोटीवर होते का ? त्याची माहिती मिळू शकलेली नाही.

Story img Loader