पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा मुंबई दौऱ्यावर येणार असून येत्या १० फेब्रुवारी ते छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे वंदे भारत ट्रेनचे उद्घाटन करणार आहेत. या दौऱ्यानिमित्त सुरक्षा व्यवस्था चोख करण्यात आली असून मुंबई पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहे.
हेही वाचा – “ममता बॅनर्जींच्या प्रतिमेला हे शोभणारं नाही”, ठाकरे गटानं विरोधकांना सुनावलं; म्हणे, “अशा वेळी…!”
यासंदर्भात मुंबई पोलिसांकडून भारतीय दंड संहितेच्या कलम १४४ अंतर्गत प्रतिबंधात्मक निर्देश जारी करण्यात आले आहेत. या निर्देशांनुसार, पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यावेळी फ्लाइंग ऑब्जेक्ट्सवर बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये ड्रोन, पॅराग्लायडर्स, सर्व प्रकारचे फुगे, पतंग आणि रिमोट कंट्रोल मायक्रोलाइट एअरक्राफ्ट यांचा समावेश आहे. विमानतळ तसेच सहार, कुलाबा, एमआरए मार्ग, एमआयडीसी आणि अंधेरी या पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात ९ फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीपासून १० फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीपर्यंत हे निर्देश लागू असणार आहेत. सुरक्षेचा उपाय म्हणून हे निर्देश जारी करण्यात आले आहेत.
दरम्यान, महाराष्ट्रात लवकरच मुंबई-सोलापूर आणि मुंबई-शिर्डी या दोन वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी १० फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून दोन्ही वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. या दोन्ही गाड्या चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरी येथे तयार करण्यात आल्या आहेत.