मुंबई : मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या विक्रोळी रेल्वेस्थानकाजवळील उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या पुलाच्या सर्व लोखंडी तुळया (गर्डर) प्रकल्पस्थळी दाखल झाल्या आहेत. तीन टप्प्यात उभारण्यात येत असलेल्या या पुलाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. मेअखेरीस हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचे मुंबई महानगरपालिकेचे नियोजन आहे.
मुंबई महापालिकेने विक्रोळी रेल्वे स्थानक परिसरात मध्य रेल्वे मार्गावर पूल उभारण्याचे काम हाती घेतले आहे. या पुलाची मुख्य तुळई (गर्डर) टाकण्याचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. सध्या पुलाचे ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित १५ टक्के काम मे २०२५ अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे.
शाळा आणि रेल्वे स्थानक असे सातत्याने रहदारी असलेला परिसर जवळ असल्याने अतिशय दक्षता घेऊन मुंबई महानगरपालिकेचे मनुष्यबळ या ठिकाणी काम करीत आहे. या पुलाच्या पूर्व बाजूचे ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. तर, पश्चिम बाजूचे काम सुरू आहे. तसेच, पश्चिम बाजूच्या ॲप्रोचेसचे काम पूर्ण झाले आहे. पश्चिम बाजूला पूल एका शाळेजवळ वळतो. त्या ठिकाणी ‘डेक स्लॅब’ टाकण्यात येणार आहे. हे काम अभियांत्रिकीदृष्टया आव्हानात्मक आहे.
६१५ मीटर लांबीचा पूल
विक्रोळी रेल्वे स्थानकाजवळ मध्य रेल्वे मार्गावर उभारण्यात येत असलेल्या पुलाची एकूण रुंदी १२ मीटर, तर लांबी ६१५ मीटर इतकी आहे. त्यापैकी ५६५ मीटरची उभारणी मुंबई महानगरपालिका करीत आहे. तसेच उर्वरित ५० मीटर लांबीपर्यंतची उभारणी मध्ये रेल्वेकडून करण्यात येणार आहे. या पुलावर टाकण्यात येणाऱ्या तुळया (गर्डर) सुमारे २५ मेट्रिक टन वजनाच्या आहेत. तसेच या तुळयांची लांबी २५ ते ३० मीटर इतकी आहे.
पुलाच्या तीन टप्प्यांत या तुळया (गर्डर) टाकण्यात येणार आहेत. प्रत्येक टप्प्यांत ६ या प्रमाणे तीन टप्प्यांत एकूण १८ तुळया (गर्डर) टाकण्यात येणार आहेत. यापैकी पहिल्या टप्प्यातील ६ तुळया यशस्वीपणे टाकण्यात आल्या आहेत. उर्वरित दोन टप्प्यांचे काम प्रगतिपथावर आहे. या पुलाच्या एकूण १९ स्तंभांपैकी पूर्वकडील १२, तर पश्चिमेकडील ७ स्तंभ उभारले आहेत.
पवईकडे जाणाऱ्या वाहनांना दिलासा
पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा हा पूल पूर्ण झाल्यानंतर पूर्व द्रुतगती महामार्गावरून पवईकडे जाणाऱ्या वाहनचालकांच्या वेळेची बचत होणार आहे. त्याचबरोबर इंधनाचीही बचत होणार आहे. तसेच घाटकोपर, विक्रोळी, कांजूरमार्ग रेल्वे स्थानकांपासून ५ किलोमीटरपर्यंतच्या परिघातील वाहनचालकांनाही या पुलाचा उपयोग होणार आहे.