देशाची आर्थिक राजधानी म्हणून बिरुद मिरविणाऱ्या मुंबईमध्ये झपाटय़ाने लोकसंख्या वाढत असून त्यामुळे उपनगरीय रेल्वेवर ताण पडत आहे. प्रवाशांच्या दृष्टीने उपनगरीय रेल्वेला वेग देण्यावर आणि ती अधिक सुरक्षित बनविण्यावर रेल्वे मंत्रालयाकडून भर देण्यात येत असल्याचे रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी मुंबईत शनिवारी लोकमान्य टिळक टर्मिनसवर आयोजित एका कार्यक्रमात सांगितले. त्याचबरोबर रेल्वे अर्थसंकल्पामध्ये जाहीर करण्यात आलेल्या नव्या रेल्वे गाडय़ा त्वरित सुरू करण्याचाही मानस त्यांनी व्यक्त केला.
रेल्वे अर्थसंकल्पामध्ये वसई रोड – विरार – रोहा मार्गावरील २ नव्या डेमु गाडय़ांना सुरेश प्रभू यांनी शनिवारी हिरवा कंदील दाखविला. वांद्रे टर्मिनस – लखनऊ सुरपफास्ट एक्स्प्रेस, वांद्रे टर्मिनस – जयपूर सुपरफास्ट एक्सप्रेस आणि लोकमान्य टिळक टर्मिनस – आजमगड एक्स्प्रेस या गाडय़ांनाही रेल्वे मंत्र्यांनी हिरवा कंदील दाखविला. तसेच लोकमान्य टिळक टर्मिनस – चेन्नई एक्स्प्रेस, लोकमान्य टिळक – करमाळी वातानुकूलित एक्स्प्रेस या गाडय़ांची घोषणाही यावेळी करण्यात आली असून त्या अनुक्रमे १५ व १८ डिसेंबरपासून सुरू करण्यात येणार आहेत. यावेळी खासदार राहुल शेवाळे, किरीट सोमय्या, गोपाळ शेट्टी आदी उपस्थित होते.
उपनगरीय प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन डबलडेकर उपनगरी गाडीचाही विचार सुरू आहे, असे प्रभू यांनी सांगितले. रेल्वे स्थानकांवरील फलाटांची उची आणि महिलांची सुरक्षितता हे दोन कळीचे मुद्दे आहेत. महिलांच्या डब्ब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून महिला वाहिनी पथके स्थापन करण्यात येणार आहेत, असे ते म्हणाले.
अपघातातील जखमींना तातडीने वैद्यक सेवा मिळण्यासाठी अधिभार लागू करावा की नाही, याबाबत न्यायालयाचा निकाल येताच योग्य पावले उचलण्यात येतील, असे प्रभू यांनी सांगितले. उपनगरी प्रवाशांवर याआधीच सुरक्षा अधिभार लागू असताना नव्या अधिभाराचे सुतोवाच मंत्र्यांनी केले आहे.

Story img Loader