मुंबई : स्त्रीरोग तज्ज्ञांच्या ‘इंडियन ऑब्स्टेट्रिक्स ॲण्ड गायनॅकॉलॉजिकल सोसायटी’ (‘फॉग्सी’) या संस्थेने देशातील माता मृत्यू दर २० टक्क्यांनी कमी करण्यासाठी विशेष अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी महिलांचे प्रबोधन करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेच्या नवनियुक्त अध्यक्षा डॉ. सुनीता तांदुळवाडकर यांनी मुंबईत आयोजित ६७ व्या ‘ऑल इंडिया काँग्रेस ऑफ ऑब्स्टेट्रिक्स ॲण्ड गायनॅकॉलॉजी’ परिषदेत केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबईमध्ये जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये बुधवारपासून ६७ व्या ‘ऑल इंडिया काँग्रेस ऑफ ऑब्स्टेट्रिक्स ॲण्ड गायनॅकॉलॉजी २०२५’ परिषदेला सुरुवात झाली. परिषदेच्या पहिल्या दिवशी आयोजित परिसंवादात संस्थेच्या डॉ. सुनीता तांदुळवाडकर यांनी महिलांच्या आरोग्यावर भर दिला. यासाठी ‘स्वस्थ जन्म अभियान, ‘नो युवर नंबर्स’ आणि ‘दो टिके जिंदगी के’ या कार्यक्रमांची घोषणा करण्यात आली आहे. सर्वांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमांमधून गर्भधारणापूर्व काळजी घेण्यासाठी महिलांना चालना देण्यासाठी १० लाखांहून अधिक आरोग्य शिबिरे आणि शैक्षणिक मोहीम राबविण्यात येणार आहे. तसेच १० लाखांहून अधिक स्त्रियांचे वजन, रक्तदाब, हिमोग्लोबिनची माहिती संकलित केली जाणार आहे. त्यामुळे मातामृत्यूचे प्रमाण २० टक्क्यांनी कमी करता येईल, असे डॉ. तांदुळवाडकर यांनी सांगितले.

हेही वाचा…बनावट दागिन्यांच्या बदल्यात खरे दागिने घेऊन महिला पसार

महिलांसाठी वैद्यकीय सुविधा

भारतीय महिलांमध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह आणि ॲनिमिया यांसारख्या आजारांचा धोका वाढत आहे. जागरुकतेचा अभाव, खराब जीवनशैली यामुळे या समस्या आणखी वाढतात. या आजारांची सुरुवातीची लक्षणे ओळखून वर्षाला १० लाख महिलांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करण्यात येणार आहे. जेणेकरून त्यांचे आरोग्य सुधारता येईल. गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून महिलांना वाचवण्यासाठी मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेद्वारे ५० लाख महिलांना एचपीव्ही लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याचेही डॉ. तांदुळवाडकर यांनी सांगितले.

हेही वाचा…भारत नगरमधील बांधकामांवरील कारवाईविरोधात, ठाकरे गटाचे आंदोलन कारवाईदरम्यान गोंधळ

डॉक्टर, अंगणवाडी सेविका आदींची मदत घेणार

‘फॉग्सी’मार्फत राबविण्यात येणाऱ्या मोहिमेसाठी ४६ हजार स्त्रीरोग तज्ज्ञ, आशा सेविका, अंगणवाडी सेविकांसह विविध स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्यात येणार आहे. रुग्णालयात येणाऱ्या महिलांमध्ये डॉक्टरांमार्फत जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच घरोघरी पोहचून अंगणवाडी सेविका व आशा सेविका जनजागृतीचे काम करणार आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fogsi launched campaign to reduce maternal mortality rate in india by 20 percent mumbai print news sud 02