मुंबई : उत्साह, आदरभाव त्याला भीमगीतांची जोड अशा भरलेल्या वातावरण अनुयायांनी चैत्यभूमीवर सोमवारी अनुभवले. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त चैत्यभूमी आणि राजगृह येथे अभिवादन करण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून सोमवारी अनुयायी दाखल झाले होते. पहाटेपासूनच लहान मुलांसह वयोवृध्दांनी तासन तास रांगेत उभे राहून डॉ. आंबेडकर यांना अभिवादन केले. अशोकस्तंभाची फुलांनी केलेली सजावट, आकर्षक विदुत रोषणाईमुळे चैत्यभूमी परिसर उजळून निघाला होता. बाबासाहेबांच्या विचारांची नव्याने ओळख करून घेण्यासाठी अनेकांनी मोठ्या प्रमाणात पुस्तकांची खरेदी केली.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दादरस्थित चैत्यभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने अनुयायी येतात. समाजातील गरीब, वंचित, दुर्बल, उपेक्षितांसाठी केलेले कार्य तसेच भारताच्या स्वातंत्र्यासाठी आंबेडकर यांनी महत्वाचे योगदान दिले आहे. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रती असलेल्या आदरापोटी महाराष्ट्राच्या विविध भागांमधून अनुयायी सोमवारी दादरमध्ये आले होते. अनेकजण रविवारीच दादरमध्ये दाखल झाले होते. सोमवारी सकाळी लवकर दर्शन घेऊन पुन्हा आपापल्या घरी परतण्यासाठी अनुयायांची लगबग सुरु होती.
मुंबईबाहेरून आलेल्या अनुयायांची गैरसोय होऊ नये, यासाठी महानगरपालिका प्रशासनातर्फे चैत्यभूमी, शिवाजी पार्क परिसरात विविध सोयी – सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. विविध स्वयंसेवा संस्थांनीही महापालिकेला सहकार्य करत आपापल्या परीने सेवा सुविधा पुरविल्या होत्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर आधारित छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन महापालिकेतर्फे करण्यात आले होते. या प्रदर्शन दालनात आंबेडकर यांच्या प्रेरणादायी जीवन प्रवासातील अनेक दुर्मीळ छायाचित्रे लावण्यात आली होती. प्रदर्शन दालनात डॉ. आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित कॉफी टेबल बुकही विक्रीसाठी उपल्बध करण्यात आले होते. त्याचबरोबर चैत्यभूमी परिसरात विक्रीसाठी उभारण्यात आलेल्या स्टॉलवरून हजारो पुस्तकांची विक्री झाली. हजारोंच्या गर्दीत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी संपूर्ण परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवास्थानी म्हणजेच राजगृहावरही भीम अनुयायांची मोठी गर्दी उसळली होती.
अनुयायांची गैरसोय टाळण्यासाठी चैत्यभूमी, शिवाजी पार्क परिसरात नियंत्रण कक्ष, पिण्याच्या पाण्याची सोया, स्वच्छतागृहे, शौचालये, जागोजागी सीसीटीव्ही यंत्रणा, समुद्री भागात जीवरक्षक बोटी आदी सुविधा देण्यात आल्या होत्या. तसेच, अग्निशमन दलाचे जवानही तैनात होते. डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारीही सेवा बजावत होते.