मॅगीवर घालण्यात आलेल्या बंदीचा निर्णय योग्य असल्याची भूमिका अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाने (एफएसएसएआय) प्रतिज्ञापत्राद्वारे उच्च न्यायालयात स्पष्ट केली आहे. स्वत:च्याच नियमांचे पालन करण्यात कंपनी अपयशी ठरल्याने ही वेळ कंपनीवर आल्याचा दावाही ‘एफएसएसएआय’ने केला आहे. दरम्यान, या प्रकरणी मंगळवारी सुनावणी होणार आहे.
मॅगीवर घातलेल्या बंदीच्या निर्णयाला आव्हान देत त्यास स्थगिती देण्याची ‘नेस्ले इंडिया’ची मागणी न्यायालयाने मागील सुनावणीच्या वेळेस फेटाळून लावली होती. मात्र याचिकेद्वारे कंपनीने उपस्थित केलेल्या मुद्दय़ांवर राज्य सरकारसह अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाला (एफएसएसएआय) दोन आठवडय़ांत उत्तर दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. शिवाय काही कारवाई करायची झाल्यास कंपनीला ७२ तास आधी त्याची सूचना द्यावी, असेही न्यायालयाने स्पष्ट केले होते.
त्यानुसार ‘एफएसएसएआय’ने प्रतिज्ञापत्र सादर करत बंदीच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. कंपनी केवळ ३० वर्षे या उत्पादनाची निर्मिती आणि विक्री करीत आहे म्हणून तिच्या सगळ्या कारखान्यांमध्ये निर्मितीबाबतच्या सगळ्या नियमांचे काटेकोर पालन केले जाते असे म्हणणे चुकीचे ठरेल. तसेच जरी कंपनीचा दावा खरा असल्याचे मान्य केले. तर मॅगीमध्ये एवढय़ा प्रमाणात शिसे आढळणे हे हेतुत: असल्याचे म्हणावे लागेल. अन्यथा चाचणीमधून ही बाब कशी काय सुटू शकते, असा प्रश्नही ‘एफएसएसएआय’ने मॅगीच्या दाव्याबाबत उपस्थित केला आहे. नोटीस दिल्याशिवाय बंदीचे आदेश दिल्याच्या कंपनीच्या दाव्याचेही ‘एफएसएसएआय’ने खंडन केले आहे. आवश्यक त्या चाचण्या केल्यानंतर तसेच जनहित लक्षात घेऊन आवश्यक त्या प्रक्रियेनंतरच बंदीचा निर्णय घेण्यात आल्याचेही ‘एफएसएसएआय’ने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
मॅगी नूडल्सची नऊ उत्पादने खाण्यास अयोग्य व आरोग्यास हानीकारक असल्याचे जाहीर करत राज्य सरकारने त्यावर बंदी घातली आहे. मात्र हा निर्णय एकतर्फी आणि बेकायदा असल्याचा दावा करत ‘नेस्ले’ने त्याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. हा निर्णय रद्द करण्याची मागणी कंपनीकडून करण्यात आली होती. तसेच निर्णयामुळे कंपनीला मोठय़ा प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागत असल्याचा दावा करत बंदीला स्थगिती देण्याची अंतरिम मागणी केली होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा