पालिकेच्या विभाग कार्यालयाकडून नागरिकांना पदार्थाचे पर्याय
इंद्रायणी नार्वेकर, लोकसत्ता
मुंबई : भाजी आणण्याचे कारण देत ऊठसूट बाहेर पडणाऱ्या आणि भाजी बाजारात गर्दी करणाऱ्या अंधेरी, पार्ले, जोगेश्वरीतील रहिवाशांना घरीच रोखण्याकरिता पालिके च्या के पश्चिम विभागाने नामी शक्कल लढवली आहे. कोणतीही भाजी न वापरता धान्य, विविध पिठे, डाळी, दूध, दही आदी पदार्थ वापरून बनविता येणाऱ्या आलू पराठा, डोसा, कढी-भात, झुणका भाकरी, शिरा अशा तब्बल ६३ पदार्थाची यादीच पालिकेच्या के पश्चिम विभागाने जाहीर केली आहे. भाजी आणायचे कारण काढून बाहेर पडणाऱ्या लोकांसाठी भाजीशिवाय कोणते पदार्थ बनवता येतील, हे सांगणारी ही यादी टाळेबंदीच्या काळात कुतुहलाचा विषय ठरली आहे.
अंधेरी, पार्ले, जोगेश्वरी हा परिसर गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील सर्वाधिक रुग्ण संख्येच्या विभागात मोजला जातो आहे. वर्सोवा, डी. एन. नगर असा अंधेरी पश्चिमचा भाग, पार्ले पश्चिम आणि गुंदवली, वेरावली व जोगेश्वरीचा पश्चिम भाग असलेला पालिकेचा के पश्चिम विभागात येतो. या विभागात ८० करोनाबाधित रुग्ण आहेत आणि रोज हा आकडा वाढतो आहे. या भागातील अनेक जण दुचाकी, चार चाकी गाडय़ा काढून भाजी, कोथिंबीर आणायला बाजारात जातात. त्यामुळे अशा नागरिकांना पोलीस हटकत असल्याच्या ध्वनी-चित्रफितीही मोठय़ा प्रमाणावर फिरू लागल्या होत्या. तरीही भाजी आणायला बाहेर पडणाऱ्या लोकांसाठी के पश्चिम विभागाने अनोखी शक्कल लढवली आहे.
या विभागातील सर्व भाजी बाजार, फळ बाजार ७ एप्रिलपासून बंद करण्यात आला आहे. तर किराणा मालाची दुकाने सोमवारी ९ ते ५ या वेळात सुरू राहणार आहेत. मात्र त्यामुळेही काही नागरिकांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर पालिकेच्या विभाग कार्यालयाने पदार्थांची यादी जाहीर केली आहे.
धान्य, विविध पिठे, डाळी, दूध, दही यापासून बनवता येतील अशा ६३ पदार्थांची ही यादी या परिसरातील लोकांना देण्यात आली आहे. त्यात झुणका भाकरी, मिसळ पाव, डोसा, इडली, पराठा, गाठिया भाजी, दाल मखनी अशा विविध प्रांतातील पदार्थांचा यात समावेश आहे.