करोना आणि त्यामुळे आलेली टाळेबंदी याचा फटका सर्व स्तरातील लोकांना बसला. हॉटेल – रेस्टॉरंट व्यावसायिकांनाही याचा फटका बसला. गेल्या दीड वर्षात राज्यात अनेक महिने बुहतांश ठिकाणी हॉटेल-रेस्टॉरंट सेवा ही बंद राहीली, जी सुरु होती ती रडतखडत सुरु होती. वीजबील, जागेचे भाडे, कर्मचाऱ्यांचा पगार यामुळे या हॉटेल- रेस्टॉरंट व्यावसायिकांचे पेकाट मोडले होते. त्यातच वाढत्या महागाईमुळे या व्यवसायाशी संबंधित सर्वच गोष्टींचे दर हे वाढले आहेत. त्यामुळे आता यापुढे हॉटेल- रेस्टॉरंटमधील खाद्य पदार्थांचे दर वाढवण्याशिवाय गत्यंतर नसल्याचं हॉटेल- रेस्टॉरंटशी संबंधित संघटना ‘आहार’ने स्पष्ट केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“दरवर्षी साधारण जून महिन्यामध्ये हॉटेल- रेस्टॉरंटमधील खाद्य पदार्थांच्या दरात वाढ होते. गेली दोन वर्ष ही वाढ झालीच नाही. तर दुसरीकरीकडे सर्वसमान्यांना करोनाचा फटका बसला आहे. तेव्हा दरवाढ करतांना याचाही विचार केला जाईल”, असं मत ‘आहार’चे उपाध्यक्ष निरंजन शेट्टी यांनी व्यक्त केलं आहे.

“याआधीच अनेक हॉटेल- रेस्टॉरंट यांनी दरवाढ केलेली आहे, करत आहेत. करोना काळामुळे हॉटेल- रेस्टॉरंट व्यवसाय हा पाच वर्षे मागे गेलेला आहे. दोन वर्षातील परिस्थिती आणि त्यात महागाई यामुळे खाद्य पदार्थांच्या दरात किमान २० टक्के एवढी दरवाढ ही अपेक्षित आहे. ही दरवाढ करतांना सर्वसामान्य ग्राहकांचाही विचार केला जात आहे” असं ‘आहार’चे सरचिटणीस सुकेश शेट्टी यांनी स्पष्ट केलं आहे.

तेव्हा जर तुम्ही हॉटेल- रेस्टॉरंटमध्ये गेलात आणि खाद्यपदार्थांचे दर वाढलेले असतील तर मुळीच आश्चर्य वाटायला नको. अनेक ठिकाणी ही दरवाढ झालेली आहे आणि यापुढील काही दिवसांत सर्वच ठिकाणी होणार आहे हे हॉटेल- रेस्टॉरंटशी संबंधित संघटनेनं दिलेल्या प्रतिक्रियांवरुन स्पष्ट होत आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Food prices in hotels restaurants will go up by 20 percent asj