मुंबई : ‘कुलाबा – वांद्रे – सीप्झ भुयारी मेट्रो ३’ मार्गिकेवरील स्थानकांमध्ये लवकरच फूड स्टाॅल, एटीएम आणि इतर सुविधा उपलब्ध होणार आहेत. मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशन लिमिटडेने (एमएमआरसी) मेट्रो ३ मार्गिकेवरील २७ स्थानकांमधील सुमारे १.३ लाख चौरस फूट जागेचा व्यावसायिक वापर करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ही जागा नुकतीच विविध कंपन्यांना भाडेतत्वावर वितरीत करण्यात आली. यातून एमएमआरसीला चांगला महसूलही मिळणार आहे.

एमएमआरसीच्या ३३.५ किमी लांबीच्या भुयारी मेट्रो मार्गिकेतील आरे – बीकेसी असा १२.५ किमीचा टप्पा सध्या वाहतूक सेवेत दाखल आहे. तर उर्वरित बीकेसी – कुलाबा टप्पा वाहतूक सेवेत दाखल होणार आहे. दरम्यान, भुयारी मेट्रो प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आजघडीला स्थानकाबाहेर वा स्थानकात खानपानाची सुविधा उपलब्ध नाही. पण आता मात्र स्थानकांवर खानपानासह एटीएमचीही सुविधा लवकरच उपलब्ध होणार आहे. खानपान, एटीएमसह इतर वस्तूंच्या विक्रीचीही दुकाने स्थानकांत असणार आहेत. त्यामुळे मेट्रो स्थानकात प्रवाशांना खरेदीही करता येणार आहे. तिकीट विक्रीसह अन्य पर्यायाद्वारे महसूल मिळविण्याच्यादृष्टीने सर्वच मेट्रो मार्गिकांवरील स्थानकांमधील जागा व्यावसायिक वापरासाठी दिली जाते. त्यानुसार एमएमआरसीनेही महसूल मिळविण्याच्या उद्देशाने स्थानकांमधील जागेचा व्यावसायिक वापर करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार यासाठी निविदा मागविल्या होत्या. निविदेनुसार नुकतेच एमएमआरसीने २७ स्थानकांवरील १.३ चौरस फूट जागा व्यावसायिक वापरासाठी विविध कंपन्यांना भाडेतत्वावर वितरीत केल्याची माहिती एमएमआरसीकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा…मालेगाव बँक खात्यांद्वारे कोट्यावधींचे गैरव्यवहार: ईडीकडून आरोपपत्र दाखल

टाटा ट्रेंट, इंडिया रिटेल अँड हॉस्पिटॅलिटी, नमन ग्रुप, अमर टी, वारणा सहकारी, रोजिअस रिटेल, मिस्टिकल ग्रुप, डेलिसिया फूड्स, आणि चितळे बंधू यांसारख्या कंपन्यांना जागेचे वितरण करण्यात आले आहे. त्यानुसार लवकरच स्थानकांवर फूड स्टाॅल, एटीएम आणि इतर वस्तूंची दुकाने थाटली जाणार आहेत. १०० फुटांपासून ४०,००० चौ. फुटांची छोटी-मोठी दुकाने आता स्थानकांवर दिसतील. दरम्यान, आठ वर्षांच्या कालावधीसाठी ही जागा कंपन्यांना देण्यात आली आहे. तर हा कालावधी वाढविण्याचीही तरतूद निविदेत करण्यात आली आहे. व्यावसायिक जागेच्या या भाडेकरारातून एमएमआरसीला २०० कोटी रुपये महसूल मिळणार आहे. आतापर्यंत संस्थेने वार्षिक सुमारे १६० कोटी रुपये आणि आगाऊ १०० कोटी रुपयांची कमाई केली आहे. या भाडेकरारामुळे एमएमआरसीला महसूल मिळेल आणि मेट्रोचे तिकीट दर स्थिर, परडवणारे ठेवता येतील. तर दुसरीकडे प्रवाशांना प्रवासादरम्यान आवश्यक त्या सोयी उपलब्ध होतील, अशी प्रतिक्रिया एमएमआरसीच्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांनी दिली.

Story img Loader