अपुऱ्या पावसामुळे अन्नधान्याच्या उत्पादनात २०१२-१३ मध्ये १८ टक्के घट अपेक्षित असून कृषी व संलग्न क्षेत्रातील वाढ उणे २.१ टक्के इतकी निराशाजनक आहे. पावसाच्या लहरीपणामुळे विकासाच्या गाडय़ाला खीळ बसण्याची चिन्हे आहेत. राज्यावरील कर्जाचा डोंगर वाढत दोन लाख ५३ हजार ८५ कोटी रुपयांवर जाणार आहे, तर वित्तीय तूट २३ हजार ६६ कोटी रुपये राहील. उद्योग क्षेत्रात ७ टक्के तर सेवा क्षेत्रात ८.५ टक्के वाढ अपेक्षित असून राज्याच्या स्थूल उत्पन्नात ७.१ टक्के वाढ अपेक्षित आहे.
विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंगळवारी सादर करण्यात आलेल्या राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालानुसार, राज्यात २०१२ मध्ये सरासरीच्या ९०.३ टक्के इतका पाऊस झाला. एकूण ३५५ तालुक्यांपैकी ३० तालुक्यात सरासरीहून अधिक, १८९ तालुक्यात सरासरीइतका तर १३६ तालुक्यांमध्ये अपुरा पाऊस झाला. औरंगाबाद, नाशिक विभागात खरीपाच्या पेरण्या उशिरा झाल्या असून रब्बी पिकांच्या क्षेत्रात घट झाली आहे. अन्नधान्याचे उत्पादन १८ टक्क्य़ांनी घटणार असून ते १०४.३९ लाख मे. टन होईल. गेल्यावर्षी हे उत्पादन १२७.३० लाख मे. टन इतके होते. मात्र तेलबियांचे उत्पादन १५ टक्के तर कापसाचे उत्पादन २ टक्क्य़ांनी वाढणे अपेक्षित आहे. ऊसाच्या उत्पादनात ३३ टक्के घट अपेक्षित आहे.
सरासरी दूधसंकलनातही वाढ झाली असून नोव्हेंबर २०१२ पर्यंत ते दररोज ३९.२२ लाख लिटर होते. वीजेची स्थापित क्षमता ३१ डिसेंबर २०१२ रोजी २२७९८ मेगावॉट होती, तर ३१ डिसेंबपर्यंत गेल्यावर्षीपेक्षा थोडी अधिक म्हणजे ६७६६३ दशलक्ष युनिट्स वीजनिर्मिती झाली.
स्थूल उत्पन्नात कृषी व संलग्न क्षेत्राचा वाटा केवळ १० टक्के असून उद्योग क्षेत्राचा वाटा २८ टक्क्य़ांपेक्षा जास्त आहे. त्यात सरासरी ९.५ टक्क्य़ांनी वाढ झाली आहे.
सेवाक्षेत्रही १०.३ टक्क्य़ांनी वाढले असून स्थूल उत्पन्नातील वाटा ५६ टक्क्य़ांपेक्षा अधिक आहे. वस्तूनिर्माण क्षेत्रातील वाढ ९.३ टक्के दराने होत असून या क्षेत्राचा वाटा १९ ते २४ टक्के आहे. व्यापार, हॉटेल्स, उपहारगृहे क्षेत्रात ८.२ टक्क्य़ांनी वाढ होत असून स्थूल उत्पन्नातील वाटा १५ टक्के तर  व्यवसाय सेवा क्षेत्राचा वाटा ९.१ टक्के आहे.
मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक व नागपूर जिल्ह्य़ांचा स्थूल उत्पन्नातील वाटा ५५.६ टक्के इतका आहे.
आर्थिक पाहणी २०१२-१३
* महसुली जमा – १,३६,७१२ कोटी रुपये
* करमहसूल १,०९,०२३ कोटी रुपये, करेतर महसूल २७,६८९ कोटी रुपये
* महसुली अधिक्य १५३ कोटी तर वित्तीय तूट २३०६६ कोटी रुपये
* राज्यावरील कर्ज – २,५३,०८५ कोटी रुपये
* वित्तीय तुटीचे स्थूल उत्पन्नाशी प्रमाण १.७  टक्के, तर ऋणभाराशी १८.४ टक्के
* निव्वळ राज्य उत्पन्न चालू किंमतीनुसार (२०११-१२) १०,८२, ७५१ कोटी रुपये, त्या आधीच्या वर्षीचे ९,३४,३७६ रुपये, १५.९ टक्के वाढ
* स्थूल राज्य उत्पन्नात ७.१ टक्के वाढ
* कृषि व संलग्न क्षेत्र (-) २.१ टक्के, उद्योग ७ टक्के तर सेवा क्षेत्र ८.५ टक्के
* दरडोई राज्य उत्पन्न ९५,३३९ रुपये
* राज्याची लोकसंख्या ११.२४ कोटी, महिलांचे प्रमाण ४८ टक्के, नागरी लोकसंख्या ४५.२ टक्के, लोकसंख्या वाढ १६ टक्के
* २०११ मधील जन्मदर १६.७ टक्के, अर्भक मृत्यूदर २५ टक्के, मृत्यूदर ६.३ टक्के

Story img Loader