कुमुद विद्यामंदिराजवळील ४९ वर्षे रखडलेल्या पादचारी पुलाचे काम सुरू
गेली ४९ वर्षे मानखुर्द आणि गोवंडी स्थानकांदरम्यान पादचारी पुलाची मागणी करणाऱ्या कुमुद विद्यामंदिर शाळेतील चार हजार मुलांची हाक अखेर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी ऐकली आहे. शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास शाळेलगत असलेल्या या पादचारी पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आल्यामुळे शाळेतील विद्यार्थी, शिक्षक आणि पालकवर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे. येत्या नोव्हेंबपर्यंत पुलाचे काम पूर्ण होईल, असे आश्वासन रेल्वेच्या वतीने देण्यात आले आहे.
पश्चिमेकडील गौतमनगर, शिवाजी नगर, लल्लुभाई झोपडपट्टीतील मुले पूर्वेकडील कुमुद विद्यामंदिरात येतात. गोवंडीच्या पूर्वेकडील ही एकमेव मराठी माध्यमाची शाळा आहे. मात्र पूल नसल्याने शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना रूळ ओलांडून जावे लागते.
रेल्वे रूळ ओलांडून ही मुले १० ते १५ मिनिटांत शाळेत पोहोचतात, तर दुसरीकडे देवनार वळसा घालून ४० ते ५० मिनिटे चालत जावे लागते. रेल्वे रूळ ओलांडताना अनेक विद्यार्थी अपघातापासून बचावले असल्याचे शाळेच्या मुख्याध्यापक वंदना उतखेडे यांनी सांगितले. विशेष म्हणजे पादचारी पूल उभारणीसाठी वर्षभरापूर्वी पायाभरणी होऊनदेखील हे बांधकाम अर्धवट अवस्थेत होते. ‘लोकसत्ता मुंबई’ने याविरोधात १७ ऑगस्ट रोजी आवाज उठवल्यानंतर २७ ऑगस्ट रोजी पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी शाळेतील विद्यार्थ्यांनी ‘प्रभूकाका, मला वाचवा’ अशी मोहीम सोशल मीडियावर सुरू केली होती.
शाळा सुरू झाल्यापासून म्हणजे ४९ वर्षांपासून पुलाच्या बांधकामाची मागणी करण्यात येत होती. अखेर प्रभूंनी शाळेच्या मुलांची आर्त हाक ऐकली आणि पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले येत्या नोव्हेंबपर्यंत पुलाचे काम पूर्ण होईल, असे रेल्वेच्या वतीने सांगण्यात आले आहे.
– अनिल मोटे, पालक प्रतिनिधी