लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई: बकरी ईदनिमित्त होणारी जनावरांची अनधिकृत आयात, कत्तल व मांस विक्रीबाबत नागरिकांना तक्रार करता यावी यासाठी मुंबई महानगरपालिकेने मदत क्रमांक कार्यान्वित केला आहे. या क्रमांकावर नागरिकांना ३० जूनपर्यंत तक्रार करता येईल.
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेच्या देवनार पशुवधगृहात ३० जूनपर्यंत जिवंत म्हैसवर्गीय प्राणी आणि बकऱ्यांच्या बाजाराचे आयोजन करण्यात आले आहे. बकरी ईदच्या दिवशी आणि त्यानंतरचे दोन दिवस धार्मिक पशुवधास परवानगी देण्यात आली आहे. धार्मिक पशुवध धोरणानुसार बकरी ईदनिमित्त पशुवधासाठी परवानगी देण्यात येते. दरवर्षीप्रमाणे म्हैसवर्गीय प्राण्यांचा धार्मिक वध हा केवळ देवनार पशुवधगृहातच करणे बंधनकारक आहे. या कालावधीत जनावरांची अनधिकृत आयात, कत्तल व मांस विक्री केली जाते. नागरिकांना याबाबत तक्रार करणे सोपे व्हावे आणि नियमबाह्य घटनांना आळा बसावा यासाठी महानगरपालिकेने सदर हेल्पलाईन क्रमांक कार्यान्वित केला आहे.
आणखी वाचा-डब्बा ट्रेडिंगच्या माध्यमातून ४६७२ कोटींची उलाढाल, गुन्हे शाखेकडून आरोपीला अटक
हा आहे क्रमांक
नागरिकांना तक्रारी करता याव्या आणि त्यांच्या समस्यांचे निवारण करता यावे यासाठी मुंबई महानगरपालिकेने ९९३०५०१२९३ हा हेल्पलाईन क्रमांक कार्यान्वित केला आहे.