“कालच्या वक्तव्यानंतर मी माझा एक व्हिडिओ देखील सर्व प्रसारमाध्यमांना दिला होता. प्रसार माध्यमांनी तो व्हिडिओ चालवला देखील होता. मी त्यामध्ये फार स्पष्टपणे म्हटलं होतं की मी बोललेल्या गोष्टीचा विपर्यास केला गेला होता आणि मी पुन्हा एकदा सांगतो, ज्या शिवसेनाप्रमुखांवर आम्ही प्रेम करतो, आमचं दैवत समजतो. त्यांच्याबद्दल व त्यांच्या वास्तुबद्दल बोलल्याबद्दल मी माझी दिलगिरी देखील व्यक्त केली होती. त्यामुळे माझ्यासाठी तो विषय आता संपलेला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील माध्यमांद्वारे सांगितलं की तो विषय आमच्यासाठी संपलेला आहे. ” असं आज माध्यमांशी बोलताना भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी सांगितलं आहे.
“ त्यांना वाटतं की हे माहीममध्ये आले म्हणजे सेना भवन फोडणारच, काही घाबरू नका वेळ आली तर तेही करू”
भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी काल माहीमध्ये भाजपाच्या एका कार्यक्रमात बोलताना शिवसेना भवनासंदर्भात केलेल्या वादग्रस्त विधानामुळे राजकीय वातावरण तापलं होतं. शिवसेना नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचेही दिसून आले. तर, हे विधान व्हायरल झाल्यानंतर प्रसाद लाड यांनी आपल्या विधानावरून घुमजाव करत आपण असं कोणतंही वक्तव्य केलेलं नसून माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आला असल्याचं कालच सांगितलं होतं त्यानंतर आज दिवसभऱ त्यांच्या वक्तव्यावर उलटसुलट प्रतिक्रिय समोर येत होत्या. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील याबाबत बोलून हा विषय आमच्यासाठी संपला असल्याचं सांगितलं. त्यानंतर आज पुन्हा एकदा प्रसाद लाड माध्यमांसमोर आले व त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
यावेळी आमदार प्रसाद लाड यांनी हे देखील सांगितलं की, “ जो विषय आहे त्याबाबत मी हे देखील म्हटलं होतं की, अरे ला करे करायची आमची तयारी आहे. आम्ही आमचे नियमित कार्यक्रम सुरू ठेवणार आहोत. आज आमची पक्षाची नगरसेवक आणि मंडळ अध्यक्षांची बैठक आहे. बुथ अभियानाचा आमचा कार्यक्रम सुरू आहे. थोड्याचवेळात आमदार नितेश राणे देखील येतील आणि आम्ही आमच्या बैठका सुरू ठेवणार आहोत. आज लालबाग परळमध्ये देखील विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांची बैठक आहे. अशाप्रकारे मुंबईतील बैठका भाजपा महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने सुरू राहणार आहेत.”
आम्ही कोणाच्या अंगावर जात नाही, आला तर सोडत नाही – फडणवीस
तसेच, “मी पुन्हा एकदा स्पष्ट करू इच्छितो, ज्या वास्तुला आम्ही दैवत मानतो. त्या वास्तुबद्दल बोलणं हे चुकीचंच झालं. परंतु कालच्या माहीमच्या कार्यक्रमला मी आणि नितेश राणे जाणार होतो. सकाळपासून विविध पोलीस स्टेशनमधून मला फोन येत होते आणि पोलीस कर्मचारी आम्हाला विनंती करत होते की, तुम्ही या कार्यक्रमाला जाऊ नका. गेलात तर बाईक रॅली काढू नका. परंतु निश्चितपणे लोकशाहीमध्ये एक राष्ट्रीय पक्ष म्हणून आम्हाला आमचे निर्णय घेण्याचा अधिकार आहे. मी माझ्या भाषणात हे म्हटलं, की ज्या ज्या वेळेला आम्ही माहीम दादरमध्ये येतो, त्यावेळी एवढा पोलीस बंदोबस्त आणि फौजफाटा असतो, की जणेकरून त्यांना वाटते की आम्ही काहीतरी शिवसेना भवनवरतीच करणार आहोत आणि त्या गोष्टीचा विपर्यास केला गेला. मी पुन्हा एकादा सांगतो की यामध्ये असं कुठलंही दुखवण्याचं कारण नव्हतं, असं मी परत एकदा आपल्या समोर स्पष्ट करतो.” असं प्रसाद लाड यांनी यावेळी बोलून दाखवलं.