मुंबई : राज्यातील सर्वात मोठी प्रवेश परीक्षा अशी ओळख असलेल्या एमएचटी-सीईटीच्या पहिला टप्प्यात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र (पीसीबी) गटासाठी घेण्यात आलेली परीक्षा १७ एप्रिल रोजी पार पडली. पीसीबी गटासाठी नोंदणी केलेल्या ३ लाख १ हजार ७२ विद्यार्थ्यांपैकी ९३.९१ टक्के विद्यार्थी परीक्षेला उपस्थित होते. ही परीक्षा महाराष्ट्रासह परराज्यांमध्ये १६८ केंद्रांवर घेण्यात आली.

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे घेण्यात येणाऱ्या एमएचटी सीईटीच्या पहिल्या टप्प्यात कृषी आणि औषधनिर्माण शास्त्र या अभ्यासक्रमासाठी महत्त्वपूर्ण असलेली भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र (पीसीबी) गटाची परीक्षा ९ ते १७ एप्रिलदरम्यान पार पडली. या परीक्षेसाठी राज्यासह देशभरातील ३ लाख १ हजार ७२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. १६८ केंद्रांवर दोन सत्रामध्ये घेण्यात आलेल्या या परीक्षेला ३ लाख १ हजार ७२ विद्यार्थ्यांपैकी २ लाख ८२ हजार ७३७ विद्यार्थी उपस्थित होते. हे प्रमाण एकूण विद्यार्थ्यांच्या ९३.९१ टक्के इतके होते. परीक्षा देणाऱ्यांमध्ये १ लाख ६५ हजार ४८२ विद्यार्थिनींचा आणि १ लाख १७ हजार २४६ विद्यार्थ्यांचा समावेश होता. तसेच ९ जण तृतीयपंथीय होते. एमएचटी सीईटीची परीक्षा दोन टप्प्यात घेण्यात येते. पहिल्या टप्प्यात पीसीबी गटाची परीक्षा यशस्वीरित्या पार पडल्याची माहिती राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे (सीईटी सेल) आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी दिली.

दररोज २३ हजार विद्यार्थ्यांची परीक्षा

पीसीबी गटासाठी नोंदणी केलेल्या ३ लाख १ हजार ७२ विद्यार्थ्यांची परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने दररोज सरासरी २३ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली. या परीक्षेला दररोज सरासरी १५०० विद्यार्थी अनुपस्थित हाेते.

अनुपस्थितीमध्ये मुलींचे प्रमाण अधिक

पीसीबी गटासाठी नोंद केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये मुलींचे प्रमाण अधिक आहे. या गटासाठी १ लाख ७५ हजार ३११ मुलींनी नोंदणी केली होती. तर १ लाख २५ हजार ७५० मुलांनी नाेंदणी केली होती. परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी १८ हजार ३३५ विद्यार्थी अनुपस्थित होते. यामध्ये ९ हजार ८२९ मुली, तर ८ हजार ५०४ मुलांचा समावेश होता. तसेच दोन तृतीयपंथीय विद्यार्थी अनुपस्थित होते.