मुंबई : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) प्रवर्गातून २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या, परंतु विहित नमुन्यामध्ये ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र सादर न केलेल्या विद्यार्थ्यांचा प्रवेश प्रलंबित ठेवण्यात आला होता. मात्र विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता एका वर्षासाठी विशेष बाब म्हणून विहित नमून्यामध्ये नसलेले ईब्ल्यूएस प्रमाणपत्र ग्राह्य धरण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे ईडब्ल्यूएस प्रवर्गातून प्रवेश घेतलेल्या जवळपास १ हजार ६०० हून अधिक विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात राबविण्यात आलेल्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक ईडब्ल्यूएस संवर्गातून प्रवेशित झालेल्या १ हजार ६०० विद्यार्थ्यांनी विहित नमुन्यातील ईडब्ल्यूएस प्रमाणपत्राऐवजी केंद्र सरकारच्या नमुन्यातील ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र सादर केले होते.

या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित विचारात घेऊन, केवळ या शैक्षणिक वर्षासाठी विशेष बाब विद्यार्थ्यांनी सादर केलेले केंद्र सरकारच्या नमुन्यातील ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र या प्रवेशासाठी ग्राह्य धरण्यास मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली. या निर्णयामुळे ईडब्ल्यूएस संवर्गातून प्रवेश घेतलेल्या १ हजार ६०० विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाने याबाबत तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाला दिले आहेत, असेही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: For one year ews certificates not in prescribed format will be accepted as special case mumbai print news sud 02