मुंबई : भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात (राणीची बाग) नुकतेच काळविटांचे आगमन झाले आहे. पुण्यातील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातून काळवीट आणण्यात आले आहेत. यामध्ये दोन मादी आणि एका नराचा समावेश आहे. दरम्यान, ही काळविटे राणीच्या बागेत दाखल झाली आली असली तरी पर्यटकांना मात्र त्यांच्या दर्शनासाठी एक महिना प्रतीक्षा करावी लागणार आहे.
राणीच्या बागेत २०१७-१८ मध्ये दुसऱ्या टप्प्यातील नूतनीकरण आणि आधुनिकीकरणाची कामे हाती घेण्यात आली होती. तपूर्वी ३३ काळवीट होते. मात्र, २०१६-१७ मध्ये ३१ काळविटांचा मृत्यू झाला. त्यात सहा नर आणि २७ माद्यांचा समावेश होता. त्यापैकी २५ माद्या आणि ६ नर काळविटांच्या मृत्यूची नोंद २०१६-१७ च्या अहवालामध्ये करण्यात आली होती. उर्वरित दोन माद्यांना राणीच्या बागेतील चितळांच्या पिंजऱ्याच्या मागील पिंजऱ्यात ठेवण्यात आले होते. मात्र, दोन वर्षांपूर्वी उरलेल्या दोन काळविटांचा वृद्धपकाळाने मृत्यू झाला.
गेल्या वर्षी प्रस्ताव दिला होता
दोन वर्षांपूर्वी राणीच्या बागेत दोन काळविटांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर राणीच्या बागेच्या प्रशासनाने पुणे येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाकडे काळविटांच्या मागणीसाठी प्रस्ताव सादर केला होता. गेल्या वर्षी काळविट मिळविण्याच्या प्रक्रियेला सुरूवात झाली होती. संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातील काळविट राणीच्या बागेत आणण्यात आले, असे प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी सांगितले.
आणखी तीन काळविटांचे आगमन होणार
पुण्यातील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातून आणखी तीन काळविटे राणीच्या बागेत आणण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यामध्ये दोन मादी आणि एका नराचा समावेश आहे. येत्या काही दिवसांमध्ये या काळविटांनाही राणीच्या बागेत आणण्यात येणार आहे. त्यानंतर राणीच्या बागेतील काळविटांची एकूण संख्या ६ होणार असून पर्यटकांची काळविट दर्शनाची प्रतीक्षाही लवकर संपणार आहे.
राणीच्या बागेला काळवीट देणगी स्वरुपात प्राप्त झाले आहे. काळविटांच्या बदल्यात पुणे प्राणिसंग्रहालयाला कोणताही प्राणी देण्यात आला नाही.
सध्या विलगीकरण कक्षात
सध्या काळविटांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत त्यांच्या विविध वैद्याकीय तपासण्या करण्यात येणार आहेत. त्यानंतर एक महिन्याने त्यांना मूळ पिंजऱ्यात आणण्यात येणार आहे. यामुळे एक महिन्यानंतरच पर्यटकांना राणीच्या बागेत काळवीटांचे दर्शन घडणार आहे.