नैसर्गिक, मानवनिर्मित आपत्तीकाळात संकटमोचक बनून नागरिकांच्या मदतीला धाऊन जाणाऱ्या मुंबई अग्निशमन दलातील महत्त्वाच्या पदावर महिलांना नियुक्तीचा मान मिळाला आहे. सहाय्यक केंद्र अधिकारी सुनीता खोत आणि एस. व्ही भोर या दोन महिला अधिकाऱ्यांना केंद्र अधिकारी पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. खोत आणि भोर या दोघी अग्निशमन दलातील पहिल्या केंद्र अधिकारी ठरल्या आहेत.

इमारत कोसळल्यानंतर अथवा आगीची घटना घडल्यानंतर तात्काळ घटनास्थळी पोहोचून दुर्घटनाग्रस्तांना मदत करणाऱ्या अग्निशमन दलाने मुंबईवर झालेल्या २६/११ च्या हल्ल्याच्या वेळी महत्त्वाची भूमिका बजावली होती. अग्निशमन दलातही महिला अधिकारी असाव्या असा एक विचार पुढे आला आणि महिलांची भरती करण्यात आली. अग्निशमन दलात २०१२ मध्ये तीन महिलांची सहाय्यक केंद्र अधिकारी पदावर भरती करण्यात आली होती. या तीनपैकी सुनीता खोत आणि एस. व्ही. भोर या दोघींना ११ ऑगस्ट रोजी केंद्र अधिकारी पदावर पदोन्नती देण्यात आली. अग्निशमन दलाच्या भायखळा अग्निशमन केंद्रात सुनीता खोत यांची, तर वडाळा अग्निशमन केंद्रात एस. व्ही. भोर यांची केंद्र अधिकारी पदावर पदोन्नती करण्यात आली आहे. या दोन्ही महिला अधिकाऱ्यांना पहिल्या केंद्र अधिकारी बनण्याचा मान मिळाला आहे.

सहाय्यक केंद्र अधिकारी पदावर असताना या दोघींनाही आठ तास पद्धतीने कर्तव्यावर राहावे लागत होते. मात्र आता या दोन महिला अधिकाऱ्यांना पदोन्नतीनंतर २४ तास कार्यपद्धतीनुसार कर्तव्यावर उपस्थित राहावे लागणार आहे. तसेच आपापल्या केंद्रांच्या हद्दीत इमारत कोसळणे, आग लागणे वा अन्य काही दुर्घटना घडल्यास घटनास्थळी मदतकार्याच्या वेळी नेतृत्व करावे लागणार आहे.

Story img Loader