केंद्रीय तपास यंत्रणांकडून गैरवापर करत कारवाई केली जात असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून होत असतानाच आणखी एका शिवसेना नेत्याची चौकशी सुरु झाली आहे. ईडीने नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर प्राप्तिकर विभागाचे अधिकारी शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या घरी पोहोचले आहेत. यशवंत जाधव यांच्या घरी प्राप्तिकर विभागाकडून धाड टाकण्यात आली असून चौकशी सुरु आहे. त्यानंतर किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत यशवंत जाधव यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
काल डर्डी डझनची यादी मी प्रसिद्ध केली होती. पण यामध्ये दोन नावे राहिली होती. यामध्ये यशवंत जाधव आणि पत्नी यामिनी जाधव आणि महापौर किशोरी पेडणेकर यांनी नावे राहिली होती. या सर्वांचे घोटाळे सिद्ध झाले आहेत. मुंबईच्या महापौरांनी आणि त्यांची कंपनीने हे मान्य केले आहे. अशाच पद्धतीने यशवंत जाधव यांच्यावर आयकर विभागाची कारवाई सुरु झाली आहे. गेल्यावर्षभरापासून यासाठी पाठपुरावा करत होतो, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.
यशवंत जाधव प्रकरण: सत्ता गेल्यापासून बुडाला आग लागल्यासारखी भाजपा वागतेय; महापौर किशोरी पेडणेकर
“यशवंत जाधव ज्या पद्धतीने मनी लॉन्डिरग करतात त्याच पद्धतीने उद्धव ठाकरेंचा परिवारही त्याच मार्गावार गेला आहे. उद्धव ठाकरेंनी मे २०२० मध्ये निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यानंतरच ही गोष्ट सुरु झाली. विधानपरिषदेसाठी अर्ज दाखल करताना मालमत्ता दाखवताना उद्धव ठाकरेंनी १९ बंगले लपवले होते. यामिनी जाधव यांनीही अर्ज सादर करताना कोट्यावधी रुपयांची मालमत्ता लपवली. याची माहिती आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी दिली. अर्ज सादर केल्यानंतर आपोआप तो आयकर विभागाकडे जातो. प्रधान डेवलपर्स नावाच्या शेल कंपनीद्वारे यशवंत जाधव यांनी १५ कोटी रुपये मिळवले. उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधींचे संबंध यशवंत जाधव यांनी घोषित केले. उदय शंकर महावार हा गांधी परिवाराचाही हवाला ऑपरेटर आहे. सोनिया गांधी परिवाराचे मनी लॉन्डिरग करणारा उदय महावार आहे. गांधी परिवारानेच उद्धव ठाकरेंसोबत त्यांची भेट घालून दिली असेल. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी महापालिकेचे फंड गोळा करणारे यशवंत जाधव यांच्यासोबत भेट करुन दिली असेल या बद्दल माहिती नाही. सोनिया गांधीच्या नॅशनल हेरॉल्डमध्ये मनी लॉन्डिरग उदय शंकर महावारने केले आहे. ज्या कंपनीला शेल कंपनी घोषित करण्यात आले त्यांना पैसे देऊन यशवंत जाधव यांच्या परिवाराने पैसे देऊन चेक घेतले आणि त्यावर तीन कंपन्या तयार करण्यात आल्या,” असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला.
“उदय महावार यांनी सांगितले आहे की यशवंत जाधव यांचा माणूस पैसे द्यायचा. ते आम्ही बॅंकेत टाकत होतो आणि तो व्यक्ती चेक घेऊन जात होता. १५ कोटी रुपये यशवंत जाधव यांच्या खात्यामध्ये यायचे आणि त्याताली काही पैसा परदेशात पाठवण्यात आला. ही माहिती प्राप्तिकर विभागाला मिळाली. त्यानंतर सर्वांकडे गेले अनेक महिने आम्ही याचा पाठपुरावा करत आहोत. त्यानंतर आज कारवाई सुरु केली आहे,” असे किरीट सोमय्या म्हणाले.