लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : परदेशामध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भारतामध्ये वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी परदेशी वैद्यकीय पदवी परीक्षा (एफएमजीई) देणे बंधनकारक असते. ही परीक्षा डिसेंबर २०२४ मध्ये होण्याची शक्यता आहे. मात्र या परीक्षेसाठी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने जारी केलेले पात्रता प्रमाणपत्र आवश्यक आहे. आयोगाने या प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू केली असून, उमेदवारांना ४ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरवर्षी अनेक विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी परदेशी जातात. वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी चीन व रशियामध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यावर हे विद्यार्थी पुन्हा भारतामध्ये वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी येतात. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने या विद्यार्थ्यांसाठी परदेशी वैद्यकीय पदवी परीक्षा बंधनकारक केली आहे. तसेच परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर या पदवीप्राप्त विद्यार्थ्यांना भारतामध्ये आंतरवासिता करणे बंधनकारक आहे. या परीक्षेत उत्तीर्ण होण्याचे प्रमाण हे १२ ते १५ टक्के आहे. महाराष्ट्रामध्ये दरवर्षी साधारणपणे १२००, तर देशात १० हजार विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊन आंतरवासिता करण्यासाठी येतात. यावर्षी परदेशातून वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून भारतात आलेल्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणारी परदेशी वैद्यकीय पदवी परीक्षा डिसेंबर २०२४ मध्ये होण्याची शक्यता आहे. मात्र या परीक्षेसाठी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने जारी केलेले पात्रता प्रमाणपत्र आवश्यक असते. या प्रमाणपत्रासाठी आयोगाने ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू केली असून, ४ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारांना आयोगाच्या संकेतस्थळावरील https://www.nmc.org.in/ActivitiWebClient/open/studentRaise या लिंकवर अर्ज करता येणार आहेत.

हेही वाचा >>>अखेर धारावी पुनर्विकासाचे भूमिपूजन रद्द; स्थानिकांच्या आक्रमक पवित्र्यानंतर डीआरपीपीएलची माघार

एफएमजीई परीक्षा देण्यासाठी आवश्यक असलेल्या पात्रता प्रमाणपत्रांसाठी अर्ज करण्याची ही शेवटची संधी आहे. त्यानंतर उमेदवारांना पात्रता प्रमाणपत्रांसाठी अर्ज करण्याची कोणतीही संधी उपलब्ध होणार नाही. यापूर्वीच पात्रता प्रमाणपत्रासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना तो पुन्हा करण्याची गरज नाही. अपूर्ण अर्ज सरसकट नाकारण्यात येणार असल्याने सर्व उमेदवारांना आवश्यक नोंदी काळजीपूर्वक तपासून अर्ज सादर करावा, असे आवाहन आयोगाकडून करण्यात आले आहे.

पात्रता अर्जाच्या स्थितीबद्दल येथे चौकशी करावी

अर्जदाराने आयोगाकडे पात्रता प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्यानंतर त्याच्या स्थितीबाबत जाणून घेण्यासाठी संबंधितांना eligibility.regn@nmc.org.in आणि eligibility@nmc.org.in वर ई-मेलद्वारे चौकशी करता येणार आहे. मात्र यासाठी उमेदवारांना त्यांचा नस्ती क्रमांक (फाईल ट्रॅकिंग क्रमांक) देणे आवश्यक आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Foreign medical degree exam held in december 2024 mumbai print news amy