मुंबई : युनायटेड किंगडम (युके) येथील कंपनीला रसायन निर्यात करून चांगला नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून व्यावसायिक महिलेची लाखो रुपयांंची सायबर फसवणूक करणाऱ्या नायजेरियन नागरिकाला माटुंगा पोलिसांनी अटक केली. आरोपींनी ई-मेल स्पुफिंग करून ही फसवणूक केली होती. अडोल्फस उचे ओनुमा असे या नागरिकाचे नाव असून सध्या तो पोलीस कोठडीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
तक्रारदार महिलेचा रसायन विक्रीचा व्यवसाय आहे. तक्रारदार महिलेला २६ जानेवारी रोजी सायंकाळी ७.४५ च्या सुमारास एक ई-मेल प्राप्त झाला. संबंधित ई-मेल gabrrelswebster@gmail.com वरून आला होता. युकेमध्ये रसायनाची विक्री करून अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष या ई-मेलमध्ये दाखवण्यात आले होते. तक्रारदार महिलेला ई-मेलमधील संदेश फायदेशीर वाटला. त्यामुळे त्यांनी ई-मेलद्वारे या व्यवहाराला होकार दिला. त्यानंतर युकेमधील कंपनीने भारतातील राम ट्रेडर्स, अरुणाचल प्रदेश या कंपनीकडून एक लिटर नमुना रसायन खरेदी करून ते पुरवण्याचे ठरले. त्यासाठी तक्रारदार महिलेने सांगितलेल्या बँक खात्यावर तीन लाख पाच हजार रुपये जमा केले. त्यानंतर तक्रारदार महिलेला त्यांच्या कार्यालयाच्या पत्त्यावर दोन दिवसांनी एक लिटर रसायन असलेले पार्सल आले. परंतु त्यानंतर त्या दोन्ही कंपन्यांशी संपर्क झाला नाही. त्यामुळे हा फसवणुकीचा प्रकार असल्याचे महिलेच्या लक्षात आले. त्यांनी याप्रकरणी स्थानिक माटुंंगा पोलिसांकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला. माटुंगा पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४), ३१९ (२), ३ (५) व माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम ६६ (क), ६६ (ड) अंतर्गत गुन्हा दाखल करून तपासाला सुरूवात केली.
प्राथमिक माहिती घेतली असता संबंधित आरोपींनी अशा प्रकारे इतरांचीही फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले. यापूर्वी मुदिनेपल्ली पोलीस ठाणे (आंध्र प्रदेश) व चंगोदर पोलीस ठाणे (गुजरात) येथे सायबर तक्रारी दाखल असल्याचे निदर्शनास आले. गुन्ह्याचे तांत्रिक विश्लेषण केले असता गुन्ह्यातील एक मोबाइल क्रमांक खारघर येथील उत्सव चौक येथून वापरात असल्याचे समजले. पुढील सखोल तपासामध्ये एक नायजेरियन नागरिक या गुन्ह्यामध्ये सामील असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपी अडोल्फस उचे ओनुमा (३५) याला खारघर येथून ताब्यात घेतले. त्याचा या गुन्ह्यांतील सहभाग स्पष्ट झाल्यानंतर माटुंगा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक प्रवीणकुमार पाटील, पोलीस हवालदार संतोष पवार, पोलीस शिपाई गोविंद शिरगिरे यांच्या पथकाने त्याला अटक केली. आरोपीला न्यायालयापुढे हजर केले असता त्याला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनाण्यात आली. आरोपीच्या अटकेमुळे आणखी सायबर गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.