सुहास जोशी
विदेशी पर्यटकांच्या भेटीचा दरवर्षीचा नोव्हेंबर ते मार्च हा हंगाम यंदाही कोरडाच गेला आहे. गेल्या वर्षी जेमतेम तीन महिने आलेल्या विदेशी पर्यटकांची संख्याही जवळपास निम्म्याने घटल्याचे दिसत आहे. वर्ष होत आले तरी अद्यापही विदेशी पर्यटकच नसल्यामुळे पर्यटनाशी निगडित व्यावसायिकांना अद्यापही काम मिळालेले नाही.
टाळेबंदीच्या शिथिलीकरणाबरोबर देशांतर्गत पर्यटनाला चालना मिळाली. स्वत:च्या वाहनाने नजीकच्या पर्यटनस्थळी जाण्याकडे कल वाढला. मात्र विदेशी पर्यटकांचा मोसम संपत आला तरी अद्यापही पर्यटन क्षेत्रातील या व्यवसायाचे गाडे रुळावर आले नाही.
केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार जानेवारीत २०१९ च्या तुलनेत वाढलेली संख्या मार्चमध्ये कमी झाल्याचे दिसते आहे. त्यानंतर एप्रिल २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय पर्यटनावर निर्बंध आले. अद्यापही विदेशी पर्यटकांची पावले भारताकडे वळलेली नाहीत.
स्थानिक व्यवसायांवर परिणाम
पर्यटन व्यवसायाशी जोडलेल्या अनेक स्थानिक छोटय़ा व्यवसायांवर यंदा मोठय़ा प्रमाणावर परिणाम झाला आहे. ‘गेल्या वर्षी फेब्रुवारीपासूनच विदेशी पर्यटकांचा ओघ कमी झाला. त्यानंतर टाळेबंदी होती. विदेशी पर्यटकांसाठी किमान सप्टेंबपर्यंत वाट पाहावी लागेल,’ असे मुंबई येथील पर्यटन व्यावसायिक रमेश माडीवलार यांनी सांगितले.
सध्या देशांतर्गत पर्यटन व्यवसायदेखील सुरळीत नाही, त्यामुळे त्या क्षेत्रात या कंपन्यांना कामाला वाव नसल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे काही कंपन्या बंद झाल्या, तर काहींनी पैसे वाचविण्याचे इतर उपाय स्वीकारल्याचे सूत्रांनी सांगितले.
एकूण पर्यटक किती?
* पर्यटन विभागाच्या आकडेवारीनुसार २०१९ मध्ये एक कोटी ९३ हजार विदेशी पर्यटकांनी भेट दिली. २०१८ च्या तुलनेत ही वाढ ३.५ टक्के इतकी होती.
* जानेवारी ते मार्च २०२० दरम्यानच्या नोंदीनुसार २४ लाख ६२ हजार २४४ विदेशी पर्यटक आले. त्यानंतरच्या नोंदी नाहीत. जानेवारी ते जून २०१९ या कालावधीच्या तुलनेत २०२० मध्ये पर्यटकांची संख्या निम्मीच आहे.
* जानेवारी २०१९ मध्ये ११ लाख ११ हजार तर २०२० मध्ये ११ लाख १८ हजार पर्यटक आले होते.
* फेब्रुवारी २०१९ मध्ये १० लाख ९० हजार तर २०२० मध्ये १० लाख १५ हजार पर्यटक आले होते.
* मार्च २०१९ मध्ये नऊ लाख ७८ हजार तर २०२० मध्ये तीन लाख २८ हजार पर्यटक आले होते.
* विदेशी पर्यटकांमध्ये सर्वाधिक म्हणजे सुमारे ३० लाख पर्यटक दिल्ली येथे तर सुमारे १४ लाख पर्यटक मुंबई येथे येतात.
पर्यटक मार्गदर्शकांनाही फटका
विदेशी पर्यटकांसाठीच्या मार्गदर्शकांना विशेष प्रशिक्षण दिले जाते, तसेच त्यांची नोंदणी पर्यटन विभागाकडे केली जाते. देशभरात सुमारे साडेतीन हजार नोंदणीकृत पर्यटक मार्गदर्शक असून, मुंबईत ही संख्या सुमारे ११० आहे. ‘वर्षभर काहीच काम नसल्याने सध्या आम्हाला अवगत असलेल्या भाषांच्या आधारे अनुवाद, तसेच व्याख्याने अशी कामे करत आहोत,’ असे पर्यटक मार्गदर्शक शैलेश मुळ्ये यांनी सांगितले. विदेशी पर्यटकांचा ओघ पुन्हा सुरू होण्यासाठी सरकारला त्यांचा आत्मविश्वास वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावा लागेल असे त्यांनी नमूद केले. ‘सहा-सात महिने भरपूर काम करून इतर वेळी या व्यवसायाशी निगडित पूरक काम, प्रशिक्षण करता येते. मुंबईतील बहुतांश पर्यटक मार्गदर्शक हे चाळिशीच्या घरात आहेत. मात्र वर्षभर काम बंद झाल्याने पर्याय शोधताना अनेकांना अडचणी येत असल्याचे,’ मुंबईतील पर्यटक मार्गदर्शक चित्रा आचार्य यांनी सांगितले.
गिर्यारोहण, पक्षी निरीक्षण सहली प्रतिसादाविना
गेल्या काही वर्षांत हिमालयात गिर्यारोहण, ईशान्य भारतात पक्षी निरीक्षण असे विशेष उद्दिष्ट ठेवून येणाऱ्या विदेशी पर्यटकांची संख्या वाढली आहे. गिर्यारोहणासाठी सर्वसाधारणपणे मार्चपासून, तर पक्षी निरीक्षणासाठी नोव्हेंबरपासून सुरुवात होते. या वर्षी यासाठी एकही आरक्षण नसल्याचे मनाली येथील खेमराज ठाकूर आणि गंगटोक येथील लक्पा तेनझिंग या पर्यटन व्यावसायिकांनी सांगितले. सर्वसाधारणपणे विदेशी पर्यटकांचा वाटा २० ते ३० टक्के असतो, पण या वर्षी त्याला शून्य प्रतिसाद आहे असे त्यांनी सांगितले.