मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळावर परदेशी महिलेकडून सुमारे नऊ कोटी रुपयांचे कोकेन जप्त करण्यात महसूल गुप्तवार्ता संचलनालयाला (डीआरआय) यश आले. महिलेच्या डोक्यावरील विगमध्ये, तसेच अंतर्वस्त्रात कोकेन लपवण्यात आले होते. परदेशी महिला युगांडामधील नागरिक असून तेथेच तिला परिचीत व्यक्तीने कोकेन दिले होते. यामागे आंतरराष्ट्रीय टोळीचा सहभाग असल्याचा संशय डीआरआयला आहे.
फातुमा नाकीतेंदे (४०) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. ती युगांडातील नागरिक आहे. युगांडातील इंटेबे विमानतळावरून ती प्रथम केनियातील नैरोबी शहरात गेली. तेथून विमानाने मुंबईत आली. एक प्रवासी महिला कोकेनसह प्रवास करीत असल्याची माहिती डीआरआयला मिळाली होती. त्यामुळे डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी मुंबई विमानतळार सापळा रचला होता. ही महिला मंगळवारी मुंबई विमातळावर आली असता तिला थांबवण्यात आले. दोन महिला अधिकाऱ्यांनी तिची तपासणी केली. त्यावेळी तिने परिधान केलेल्या विगचे वजन अधिक असल्याचे जाणवले. त्यामुळे तो कापून तपासणी केली असता त्यात एक पावडर सापडली. त्यानंतर डीआरआयने तिची झडती घेतली असता तिच्या अंतर्वस्त्रात लपवलेली पावडर सापडली. तपासणीत ते कोकेन असल्याचे निष्पन्न झाले.
हेही वाचा – गायी, म्हैशीमुळे ४०० हून अधिक वेळा रेल्वे सेवा विस्कळीत
फातुमाकडून एकूण ८९० ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले असून त्याची किंमत आठ कोटी ९० लाख रुपये आहे. त्यानंतर सीमाशुल्क कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली. चौकशीत तिची आर्थिक परिस्थिती ठीक नसल्यामुळे तिने कोकेन तस्करी करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. त्यासाठी तिला एक हजार डॉलर्स (८३ हजार रुपये) मिळणार होते. पण त्यापूर्वीच तिला अटक झाली. युगांडा येथील एका परिचीत मित्राने तिला कोकेन दिले होते. विमानतळावरून बाहेर पडल्यानंतर तिच्याशी संपर्क साधून कोकेन घेण्यासाठी एक व्यक्ती येणार होती. फातुमाचा सर्व प्रवास खर्च व राहण्याचा खर्च मुख्य आरोपीने केला होता. याप्रकरणामागे आंतरराष्ट्रीय टोळीचा सहभाग असल्याचा संशय असून त्याबाबत डीआरआय तपास करीत आहे.