लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : आरे वसाहतीत सापडलेल्या बिबट्याच्या कातडीचे आणि नखांच्या तपास वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुरू केला आहे. दरम्यान, हे अवशेष फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविण्यात आले असून आरे वसाहतीत सापडलेल्या बिबट्याच्या कातडीला उजवीकडे एक छिद्र असल्याचे समोर आले आहे. यावरून बिबट्याला लांबून गोळी मारली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
आणखी वाचा-प्रसिद्ध चित्रपट कलाकार राकेश बेदी यांची सायबर फसवणूक
आरे वसाहतीत गणेश मंदिर तलावाजवळ कापडात गुंडाळलेली बिबट्याची कातडी आणि नखांचे काही भाग आढळून आले होते. दरम्यान, प्रत्यक्षदर्शींनी तातडीने या घटनेची माहिती आरे वसाहतीतील पोलीस ठाण्याला दिली. त्यानुसार वनविभागाने पुढील कारवाई करण्यास सुरुवात केली. दरम्यान, ठाणे वन विभागाचे (प्रादेशिक) उप वनसंरक्षक संतोष सस्ते म्हणाले की, आम्ही आधीच तपास सुरू केला आहे. बिबट्याची कातडी फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवली आहे. प्रथमदर्शनी असे दिसून येते की कातडी खूप जुनी आहे आम्ही सर्व बाजूंनी या घटनेचा तपास करत आहोत.
वन्यजीव संशोधक बिबट्यांच्या नमुन्यांचा अभ्यास करत आहेत. हे अवशेष आरे जंगल आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबट्यांच्या नमुन्यांशी मिळते जुळते आहेत का हे तपासण्यात येणार आहे.