झाडे वाचण्याचे प्रमाणही २० टक्क्यांपेक्षा कमी; कॅगचे निरीक्षण * हजारो कोटी रुपये खर्च करूनही वनक्षेत्रात वाढ नाहीच
आघाडी सरकारच्या काळात तीन कोटी झाडे लावण्याचे उद्दिष्ट ठेवून ते साध्य करण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. येत्या १ जुलैला राज्यात दोन कोटी झाडे एकाच दिवशी लावण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आयोजित केला आहे. मोठय़ा प्रमाणावर वृक्षारोपण किंवा हिरवाई वाढविण्याकरिता प्रयत्न करण्यात येत असले तरी प्रत्यक्षात राज्यातील वन क्षेत्रात घट झाली आहे. तसेच वृक्षारोपणानंतर झाडे वाचण्याचे प्रमाण राज्यात २० टक्क्यांपेक्षा कमी असल्याचे निरीक्षण भारताचे नियंत्रक आणि लेखापरीक्षकांनी (कॅग)ने नोंदविले आहे.
एकूण क्षेत्रफळाच्या ३३ टक्के क्षेत्रफळ हे वनाखाली असावे असे आंतरराष्ट्रीय प्रमाण मानले जाते. महाराष्ट्रात हे प्रमाण फक्त १६.४५ टक्के आहे. विशेष म्हणजे २००८ पासून सरकारने हे क्षेत्र वाढविण्याकरिता सुमारे सात हजार कोटी रुपये खर्च केले, पण वन क्षेत्रात वाढ तर झाली नाहीच, उलट हे क्षेत्र घटल्याचा निष्कर्ष भारताचे नियंत्रक आणि लेखापरीक्षकांनी (कॅग) काढला आहे. वन क्षेत्रात घट झाल्यानेच आघाडी सरकारच्या काळात मोठय़ा प्रमाणावर वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला. २०११-१२ या वर्षांत सव्वातीन कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. यानुसार राज्यात तीन कोटींपेक्षा जास्त झाडे लावण्यात आल्याचे तत्कालीन वनमंत्री डॉ. पतंगराव कदम आणि राज्याचे मुख्य वनसंरक्षक ए. के. जोशी यांनी जाहीर केले होते.
‘कॅग’च्या अहवालात राज्यातील वन क्षेत्र घटल्याबद्दल प्रकाश टाकण्यात आला होता. २००७ पासून राज्यात वन क्षेत्र वाढविण्याकरिता सुमारे सात हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले, पण त्याचा फार काही उपयोग झाला नाही. याबद्दलही कॅगने आक्षेप नोंदविला आहे. २००७ मध्ये राज्यातील एकूण वन क्षेत्र ५०,६५० चौरस किमी होते. २०१५ अखेरीस हेच क्षेत्र ५०,६२८ चौरस किमी एवढे घटले आहे. राज्यातील एकूण वन क्षेत्रात २२ चौरस किमी घट झाली आहे.
* आंतरराष्ट्रीय मानांकनानुसार वृक्षारोपणानंतर तीन वर्षांने किमान ४० टक्के झाडे वाचणे अपेक्षित असते. २० ते ४० टक्के झाडे वाचल्यास वृक्षारोपणाचे संमिश्र यश मानले जाते.
* महाराष्ट्रात वृक्षारोपणानंतर तीन वर्षांत झाडे वाचण्याचे सरासरी प्रमाण २० टक्क्यांपेक्षा कमी असल्याचे आढळून आले .
दोन कोटींसाठी मुनगंटीवार आक्रमक
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी १ जुलैला दोन कोटी झाडे लावण्याचा निर्धार केला आहे. यासाठी सरकारी यंत्रणा, शाळा, स्वयंसेवी संस्था, धार्मिक संघटना अशा विविध क्षेत्रांतील संस्था वा संघटनांची मदत घेण्यात आली आहे. राज्यातील हिरवाई वाढविण्याकरिता हा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. नुसते वृक्षारोपण करून नव्हे तर झाडे वाचविण्याची मोहीम हाती घेण्यात येणार आहे. यासाठीच लावलेली झाडे संस्थांनी दत्तक घेऊन त्यांची निगराणी करावी, अशी योजना असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.