मुंबई : ठाणे-बोरिवली दुहेरी भुयारी मार्ग प्रकल्पाला केंद्रीय वन्यजीव मंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर आता केंद्रीय वन विभागानेही हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाला असून, लवकरच भूमिपूजन केले जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे-बोरिवली अंतर केवळ २० मिनिटांत गाठता यावे, यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) ११.८ किमी लांबीचा भुयारी मार्ग प्रकल्प राबवीत आहे. या मार्गात १०.२५ किमी लांबीच्या दोन भुयारी मार्गांचा समावेश आहे. या प्रकल्पाचे काम हैदराबादच्या मेघा इंजिनीयरिंग इन्फ्रास्ट्रक्चर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला देण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी १६,६००.४० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पाचे बांधकाम चालू वर्षात सुरू करण्याचे नियोजन आहे.

हेही वाचा >>>अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण; मारेकऱ्याच्या अंगरक्षकाला अटक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १२ जानेवारी रोजी या प्रकल्पाचे भूमिपूजन करून प्राथमिक कामास सुरुवात करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला होता. मात्र संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या भुयारी मार्ग प्रकल्पासाठी केंद्रीय वन्यजीव मंडळ आणि राज्य वन्यजीव मंडळाची परवानगी आवश्यक आहे. राज्य वन्यजीव मंडळाने प्रकल्पास मान्यता दिली होती. मात्र केंद्रीय वन्यजीव मंडळाची मंजुरी शिल्लक असल्याने एमएमआरडीएला १२ जानेवारी रोजी भूमिपूजन करता आले नाही. दरम्यान, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात केंद्रीय वन्यजीव मंडळाने या प्रकल्पास हिरवा कंदील दाखवल्याची माहिती महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी दिली. या प्रकल्पाचे लवकरच भूमिपूजन करून प्राथमिक कामास सुरुवात करण्यात येणार आहे.

हेही वाचा >>>अभिषेक घोसाळकर हत्याप्रकरण: ठाकरे-शिंदे गटात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

काम पूर्ण करण्यासाठी पाच वर्षांची मुदत

भुयारी मार्गाच्या कामासाठी चार ‘टीबीएम’ यंत्रांची आवश्यकता आहे. जपानमधील एक कंपनी प्रथमच ही यंत्रे चेन्नईत तयार करणार आहे. यासाठी नऊ ते दहा महिन्यांचा कालावधी अपेक्षित आहे. त्यामुळे प्रत्यक्ष कामास वर्षाअखेरीस सुरुवात होण्याची शक्यता आहे. तर काम सुरू झाल्यापासून पाच वर्षांत पूर्ण करावे लागणार आहे. त्यामुळे भुयारीमार्गे ठाणे – बोरिवली अंतर केवळ २० मिनिटांत गाठण्यासाठी वाहनचालक व प्रवाशांना २०२९-३० पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.