मुंबई : नवी मुंबईतील नेरुळ येथील डीपीएस फ्लेमिंगो तलाव संरक्षित ठेवण्यासाठी राज्य वन विभागाने एक पाऊल पुढे टाकून जनमत गोळा करण्यास सुरुवात केली आहे. यासाठी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येत असून डीपीएस फ्लेमिंगो तलाव संरक्षित ठेवण्यासाठी आतापर्यंत एक हजाराहून अधिक नागरिकांनी स्वाक्षरी केल्या.

नेरुळमधील डीपीएस फ्लेमिंगो तलावात खाडीतून भरतीच्या वेळी येणारे पाणी सिडकोनेच बनवलेल्या नेरुळ जेट्टीच्या कामामुळे अडवले गेले होते. त्यामुळे डीपीएस तलाव कोरडाठाक पडून या तलावात फ्लेमिंगो येणे बंद झाले होते. याबाबत पर्यावरणप्रेमींनी नाराजी व्यक्त केली होती. कांदळवनाबरोबरच फ्लेमिंगोचा अधिवास नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करत पर्यावरण संस्थानी आंदोलनही केले होते.

दरम्यान, खाडीतून येणारा पाण्याचा प्रवाह कोणत्याही परिस्थितीत रोखला जाता कामा नये, असे स्पष्ट निर्देश राज्य सरकारने यासंबंधी नेमलेल्या वरिष्ठ तज्ज्ञ अधिकाऱ्यांच्या समितीने कांदळवन विभागाला दिले होते.

कांदळवन कक्षाच्या विनंतीलाही बगल

डीपीएस फ्लेमिंगो तलावात आंतर भरती ओहोटीच्या पाण्याचा प्रवाह पुनर्संचयित करण्यासाठी सिडकोला राज्याच्या कांदळवन कक्षाने विनंती केल्यानंतरही दोन महिने पाण्याचा प्रवाह रोखण्यात आला होता. यामुळे हा अधिवास स्थलांतरित पक्ष्यांसाठी धोकादायक ठरू लागला. तलावात फ्लेमिंगो येणेही बंद झाले होते.

उच्चस्तरीय समितीचे म्हणणे काय ?

गेल्या वर्षी डीपीएस तलावाच्या परिसरात अनेक फ्लेमिंगोचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर स्थापन करण्यात आलेल्या वन सचिव वेणुगोपाल रेड्डी यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीने डीपीएस तलावाला संरक्षित ठेवण्याची शिफारस करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सिडकोलाही तलावामध्ये अखंडित पाण्याचा प्रवाह सुनिश्चित करण्यास सांगितले आहे.

गणेश नाईक यांचे निर्देश

डीपीएस फ्लेमिंगो तलावात भरतीचे येणारे पाणी अडवल्यामुळे शेवाळ साचले असून पाण्याला दुर्गंधी येत आहे. त्यामुळे या तालावात फ्लेमिंगोंचे आगमन झाले नाही. भरतीचे पाणी तलावात येऊन पुन्हा ते ओहोटीच्या वेळी समुद्रात जायला हवे, परंतु हे पाणी अडवले आहे. हे पाणी सिडकोनेच अडवले असून ते तात्काळ खुले करून देण्याचे निर्देश वनमंत्री नाईक यांनी दिले आहेत.

पाणी परतीचा मार्ग माती टाकून बंद

वनमंत्री गणेश नाईक यांच्या निर्देशांनंतर भरतीचे पाणी तलावात येण्याचा मार्ग मोकळा केला होता. परंतु आता खाडीतून आलेले पाणी परत खाडीत जाण्यासाठीचा मार्ग माती टाकून बंद करण्यात आला आहे. दरम्यान, याबाबत नॅटकनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी. एन. कुमार यांनी माहिती अधिकार कायद्यांतर्गत तलावाच्या आत आणि बाहेर पाण्याचा अखंड प्रवाह सुरू राहण्यासाठी काय उपाय केले जात आहेत याबाबत विचारणा केली होती.

यावर त्यांना कांदळवन कक्षाने डीपीएस तलावाच्या आत आणि बाहेर पाण्याचा प्रवाह खुला ठेवण्याच्या आणि फ्लेमिंगो अधिवासाचे संरक्षण करण्याच्या उच्चस्तरीय समितीच्या निर्णयाची माहिती देण्यात आली. दरम्यान, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील विमानाला पक्ष्यांचा धोका टाळण्यासाठी डीपीएस तलाव आणि एनआरआय, टीएस चाणक्य आणि पाणजे पाणथळ यांसारखी स्थलांतरित पक्ष्यांची ठिकाणे जतन करणे आवश्यक आहे. परंतु जाणीवपूर्वक पाण्याचा प्रवाह रोखण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप वारंवार पर्यावरणप्रेमींकडून करण्यात येत आहे. यंदाच्या हंगामात फ्लेमिंगो डीपीएस तलावाकडे फिरकलेच नाहीत.

मोहिमेसाठी समाजमाध्यमाचा वापर

तलावाला संरक्षित ठेवण्यासाठी सध्या राबविण्यात आलेल्या स्वाक्षरी मोहिमेला नागरिकांचा, पर्यावरणप्रेमींचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. जैवविविधतेचे रक्षण करण्यासाठी नागरिक उत्साहाने पुढाकार घेत आहेत. त्यामुळे ही मोहीम समाज माध्यमाद्वारे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम आम्ही करू असे ‘सेव्ह फ्लेमिंगो’ आणि ‘मॅन्ग्रोव्हज फोरम’च्या रेखा सांखला यांनी सांगितले.

Story img Loader