वनविभागाकडून रहिवाशांना घरे तोडण्याच्या नोटिसा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीत येणाऱ्या घोडबंदर गावातील शेकडो कुटुंबांवर बेघर होण्याचे संकट कोसळले आहे. ही सर्व कुटुंबे वन विभागाच्या हद्दीत अनधिकृत वास्तव्य करत असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला असून, वनविभागाने त्यांना ही घरे तोडण्याच्या नोटिसा पाठवल्या आहेत. बेघर होण्याची वेळ आल्याने या रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

[jwplayer zVOMyVTv]

बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची हद्द थेट घोडबंदर गावापर्यंत येत आहे. गावातील साईनाथ सेवानगर वस्तीमधील २२५ घरे वनविभागाच्या हद्दीत येतात. सुमारे पस्तीस ते चाळीस वर्षांपासून हे रहिवासी याठिकाणी राहत आहेत. उच्च न्यायालयात दाखल झालेल्या एका याचिकेवर न्यायालयाने वनविभागाच्या हद्दीतील घरे हटविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार वनविभागाने या घरांना सात हजार रुपये भरण्याचे आदेश दिले होते. २२५ पैकी ९० कुटुंबांनी पैसे भरल्याने वनविभागाकडून त्यांचे अन्यत्र पुनर्वसन करण्यात आले, परंतु उर्वरित कुटुंबांनी मात्र पैसे भरलेच नाहीत. परिणामी, आता वनविभागाने त्यांना घरे रिकामी करून स्वत:हून तोडण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. घरे रिकामी न केल्यास वनविभागाकडून ही घरे तोडण्यात येऊन संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्याचा इशारा वनविभागाने दिल्याने ही कुटुंबे भयभीत झाली आहेत. वनविभागाच्या हद्दीत येणारी कुटुंबातील बहुतांश सदस्य रोजंदारीने काम करणारे असल्याने त्यांना वनविभागाकडे सात हजार रुपये भरणे शक्य झाले नव्हते. त्यामुळे आता त्यांच्यावर कारवाईची कुऱ्हाड लटकत आहे. मात्र आता घर जाण्याच्या भीतीने ही कुटुंबे पैसे भरण्यास तयार असल्याची माहिती घोडबंदर येथील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र ठाकूर यांनी दिली. स्थानिक नगरसेविका दक्षता ठाकूर यांनी येथील रहिवाशांसह संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या मुख्य वनरक्षकांची भेट घेऊन रहिवाशांच्या सह्य़ांचे निवेदन दिले आणि कारवाई थांबविण्याची विनंती केली आहे.

वनविभागाकडून घरांवर खुणा

या कुटुंबाव्यतिरिक्त साईनाथ सेवा नगरातील आणखी काही घरांवर वनविभागाकडून खुणा करण्यात आल्या आहेत, मात्र यावर स्थानिकांनी आक्षेप घेतला आहे. वनविभागाकडून १९७० ते १९८९ दरम्यान करण्यात आलेल्या सर्वेक्षणात ही घरे वनविभागाच्या हद्दीत नसल्याचे दिसून आले होते. मात्र वनविभागाने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात ही घरे वनविभागाच्या हद्दीत असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. परंतु ही घरे घोडबंदर गावाठाणाच्या जमिनीवर वसली असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. वनविभागाच्या सर्वेक्षणावर आक्षेप घेत सर्वेक्षण पुन्हा करण्याची मागणी रहिवाशांनी केली असल्याचे घोडबंदर येथील ग्रामस्थ विलास थोरात यांनी सांगितले.

[jwplayer y8Pn2zMM]