मुंबई : वाघांचे मूत्यू आणि शिकार चिंताजनक बाब असून, वाघांची शिकार रोखण्यासाठी मेळघाटप्रमाणे सर्वच जंगलात विशेष दक्षता पथक नेमण्यात यावेत, असे निर्देश वनमंत्री गणेश नाईक यांनी व्याघ्र शिकार संर्दभात घेतलेल्या आढावा बैठकीत दिले. राज्यात मागील काही महिन्यांत २५ वाघांची शिकार झाली आहे. शिकार करणाऱ्या बहेलिया टोळीला अटक करण्यात आली आहे. त्यांची चौकशी सुरू असून शेजारच्या राज्यातील वाघांच्या शिकारी देखील या टोळीने केलेल्या आहेत.
राज्यातील वाघांच्या शिकारीचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन वनमंत्री गणेश नाईक यांनी मंत्रालयातील सभागृहात वन अधिकाऱ्यांची एक बैठक आयोजित केली होती. यावेळी मुख्य वन्यजीव संरक्षक विवेक खांडेकर, प्रधान मुख्य वन संरक्षक एम. एस. राव, अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक क्लेमेंट बेन, ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक जितेंद्र रामगावकर उपस्थित होते.
वाघांची शिकार करणाऱ्या टोळीला वन कायद्याची जरब बसली पाहिजे. शिकार करणाऱ्या या टोळ्यांची साखळी उद्ध्वस्त करण्यासाठी वन विभागाने विविध उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. जंगलात वन विभाग अधिकाऱ्यांची गस्त वाढविणे, वाघांचे भ्रमंती मार्ग, पाणवठ्यांच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेर बसविण्यात यावेत. शिकाऱ्यांची माहिती देणाऱ्या खबऱ्यांचे जाळे विकसित करण्यात यावे आणि संशयित व्यक्तींवर लक्ष ठेवणे यासारख्या उपाययोजना तातडीने कराव्यात अशा सूचना नाईक यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच बिनतारी संदेश यंत्रणांचे प्रमाण वाढविण्यात यावे. वाघांची शिकार रोखण्यासाठी लागणाऱ्या उपाययोजनांचे तातडीने प्रस्ताव तयार करण्यास नाईक यांनी सांगितले.