राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारमध्ये सामील होऊन १०० दिवस पूर्ण झाल्यानिमित्त महाराष्ट्रातील जनतेसाठी खुलं पत्र लिहिलं होतं. यामध्ये त्यांनी शरद पवारांचा नामोल्लेख टाळत यशवंतराव चव्हाण यांचा उल्लेख केला होता. यावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. अजित पवारांकडून आता यशवंतराव चव्हाणांच्या नावाचा वापर केला जातोय, अशी दबक्या आवाजात चर्चा आहे. या चर्चांवरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही अजित पवारांचा उल्लेख न करता त्यांना कोपरखळी मारली आहे. मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटर येथे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने महिला कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत त्या बोलत होत्या.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “आसामच्या मुख्यमंत्र्यांना भेटल्यावर मला आनंद होतो. आसामचा संपूर्ण भाग ते कंट्रोल करतात. हेमंत बिस्वा सरमा (आसामचे मुख्यमंत्री) यांना भेटल्यावर मी नेहमी त्यांना थंम्प्स अप करते. मला सगळे म्हणतात तुम्ही त्यांना भेटल्यावर एवढं चिअरअप का करतात? कारण ते मुळचे काँग्रेसचेच आहेत. आता त्यांनी नॉर्थ इस्ट भाजपासाठी मोठं केलं असलं तरीही ते मुळचे काँग्रेसचे आहेत. त्यांच्याकडे (भाजपाकडे) कोणी टॅलेंट नाहीय, म्हणून त्यांना बाहेरून माणसं घ्यावी लागतात. पण आपला विचार तिथे जातोय हे चांगलंच आहे”, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी भाजपावर टीका केली.
हेही वाचा >> “माझ्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष…”, अजित पवारांचं महाराष्ट्राला खुलं पत्र!
“बाकीही हेडगेवार विसरून यशवंतराव चव्हाणांचं नाव घेत आहेत, यातच आपलं यश आहे. यशवंतरावांचं नाव घेणं २५ टक्के लोकांनी सुरू केलंय. उरलेल्या ७५ टक्के लोकांनी सुरू करायचं बाकी आहे. त्यांच्याही (विद्यमान सरकारच्या) हे लक्षात आलंय की हेडगेवारांचं नाव घेऊन मतं मिळत नाहीत. ट्रिपल इंजिन सरकारमधील तिघांबाबत मी बोलतेय. याही सरकारमध्ये चव्हाणांचा फोटो मोठा होतोय, याचा मला सार्थ अभिमान आहे”, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांवर केली आहे.
यशवंतराव चव्हाणांबाबत अजित पवार काय म्हणाले होते?
“राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं नेहमीच युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श, फुले-शाहू-आंबेडकरांचे विचार व वंदनीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या लोककल्याणाचे धोरण यांचा वारसा जपला आहे. माझ्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही पुढील काळात हीच परंपरा कायम जपणार आहे”, असं आश्वासन अजित पवारांनी पत्रात दिलं.